शनिवार, २८ जुलै, २००७

मग माझा जीव तुझ्या - सुरेश भट

मग माझा जीव तुझ्या

दुःखाच्या वाटेवर गाव तुझे लागले
थबकले न पाय तरी, ह्र्दय मात्र थांबले

वेशीपाशी उदास हाक तुझी भेटली
अन माझि पायपीट डोळ्यातून सांडली

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल
अन माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल

मी फिरेन दूर दूर तुझिया स्वप्नात चूर
तिकडे पाउल तुझे उंबर्यात अडखळेल

विसरशील सर्व सर्व आपुले रोमांच पर्व
पण माझे नाव तुझ्या ओठांवर हुळ्हुळेल

सहज कधी तू घरात लावशील सांजवात
माझेही मन तिथेच ज्योती सह थरथरेल

जेंव्हा तू नाहशील दर्पणात पाहशील
माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल

जेंव्हा रात्री कुशीत माझे घेशील गीत
माझे तारुण्य तुझ्या गात्रातून गुणगुणेल

मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद
माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल

मग माझा जीव तुझ्या - सुरेश भट

मग माझा जीव तुझ्या

दुःखाच्या वाटेवर गाव तुझे लागले
थबकले न पाय तरी, ह्र्दय मात्र थांबले

वेशीपाशी उदास हाक तुझी भेटली
अन माझि पायपीट डोळ्यातून सांडली

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल
अन माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल

मी फिरेन दूर दूर तुझिया स्वप्नात चूर
तिकडे पाउल तुझे उंबर्यात अडखळेल

विसरशील सर्व सर्व आपुले रोमांच पर्व
पण माझे नाव तुझ्या ओठांवर हुळ्हुळेल

सहज कधी तू घरात लावशील सांजवात
माझेही मन तिथेच ज्योती सह थरथरेल

जेंव्हा तू नाहशील दर्पणात पाहशील
माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल

जेंव्हा रात्री कुशीत माझे घेशील गीत
माझे तारुण्य तुझ्या गात्रातून गुणगुणेल

मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद
माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल

गुरुवार, १९ जुलै, २००७

संथ निळे हे पाणी - मंगेश पाडगांवकर

संथ निळे हे पाणी
वर शुक्राचा तारा
कुरळ्या लहंरीमधुनी
शिळ घालतो वारा

दुर कमान पुलाची
एकलीच अंधारी
थरथरत्या पाण्याला
कसले गुपीत विचारी

भरुन काजव्याने हा
चमके पिंपळ सारा
स्तिमीत होऊनी तेथे
अवचित थबके वारा
किरकीर रात किड्यांची
निरवतेस किनारी
ओढ लागुनी छाया
थरथरते अंधारी
मध्येच क्षितीजावरुनी
विज लकाकुन जाई
अन ध्यानस्थ गिरी ही
उघडुनी लोचन पाही
हळुच चांदने ओले
थिबके पाणावरुनी
कसला क्षन सोनेरी
उमले प्राणामधुनी

संथ निळे हे पाणी
वर शुक्राचा तारा
दरवळला गंधाने
मओनाचा गाभारा

बुधवार, १८ जुलै, २००७

फत्तर आणि फुलें - केशवकुमार

होता डोंगरपायथ्यास पडला धोंडा भला थोरला;
वर्षें कैकहि तरि न तो हाले मुळीं आपुला !
आनंदी फुलवेल एक जवळी होती सुखें राहत;
बाळें सांजसकाळ हांसत तिचीं तैशींच कोमेजत !

थट्टेखोर फुलें हंसूनि ती वदलीं धोंड्यास त्या एकदां;
"धोंडा केवळ तूं ! अरे, न जगतीं कांहीं तुझा फायदा !"
संतापून तयांस फत्तर म्हणे " कां हीं वॄथा बोलणीं ?
सारी सुंदरता इथेंच तुमची जाईल रे वाळुनी !"

धोंडयाच्या परि काळजास भिडले ते शब्द जाऊनियां;
काळाठिक्कर यामुळें हळुहळू तो लागला व्हावया.
पुष्पांच्या कवळ्या मनांतहि सले तें फत्तराचें वच;
गेली तोंडकळा सुकून, पडलीं तीं पांढरीं फारच !

कोणी त्या स्थलिं शिल्पकार मग तों ये हिंडतां हिंडतां,
त्याच्या स्फुर्तिस फत्तरांत दिसली काहंहींतरी दिव्यता;
त्याची दिव्यकलाकरांगुलि न जों त्या फत्तरा लागली,
श्रीसौंदर्यमनोरमा प्रगटुनी साक्षात् उभी राहिली !

वेडा पीर असाच गुंगत कुणी एकाकि ये त्या स्थळा,
ती मूर्ती बघतांच तो तर खुळा नाचावया लागला !
त्यानें ती खुडुनी फुलें भरभरा पायीं तिच्या वाहिलीं,
तों, त्यांची फुलुनी कळी खद्खदां सारीं हसूं लागलीं !

लावण्यकॄति ती वनांत अजुनी आहे उभी हांसत,
पुष्पेंही बसलींत तीं बिलगुनी पायीं तिच्या खेळत !

गुरुवार, १२ जुलै, २००७

त्रिधा राधा - पु.शि. रेगे

आभाळ निळे तो हरि,
ती एक चांदणी राधा,
बावरी,
युगानुयुगीची मनबाधा

विस्तीर्ण भुई गोविंद,
क्षेत्र साळीचे राधा,
संसिद्ध,
युगानुयुगीची प्रियंवदा

जलवाहिनी निश्चल कृष्ण,
वन झुकले काठी राधा,
विप्रश्न,
युगानुयुगीची चिरतंद्रा

बुधवार, ११ जुलै, २००७

पेर्ते व्हा - बहीणाबाई चौधरी

पेरनी पेरनी
आले पावसाचे वारे
बोलला पोपया
पेर्ते व्हा रे, पेर्ते व्हा रे!

पेरनी पेरनी
आभायात गडगड,
बरस बरस
माझ्या उरी धडधड!

पेरनी पेरनी
आता मिरुग बी सरे.
बोलेना पोपया
पेर्ते व्हा रे, पेर्ते व्हा रे!

पेरनी पेरनी
अवघ्या जगाच्या कारनी.
ढोराच्या चारनी,
कोटी पोटाची भरनी

मंगळवार, १० जुलै, २००७

सकाळी उठोनी - बा. सी. मर्ढेकर

सकाळी उठोनी | चहा-काँफी घ्यावी,
तशीच गाठावी| विज-गाड़ी||

दाती तृण घ्यावे | हुजूर म्हणून;
दुपारी भोजन| हेची सार्थ ||

संध्याकाळ होता | भूक लागे तरी,
पोराबाळांवरी | ओकू नये||

निद्रेच्या खोपटी | काळजीची बिळे,
होणार वाटोळे| होईल ते||

कुण्याच्या पायाचा | काही असो गुण;
आपुली आपण| बिडी प्यावी||

जिथे निघे धूर| तेथे आहे अग्नी;
आम्ही जमद्ग्नी | प्रेतरुपी||

मंगळवार, ३ जुलै, २००७

दिलगीरी

कार्यबाहुल्यामुळे इथे कविता पाठवणे अवघड जात आहे. त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
जर आपल्याकडे काही कविता असल्यास त्या आपण जरुर पाठवू शकता!