दिला जन्म तू विश्व हे दाविलेस
किती कष्ट माये सुखे साहिलेस
जिन्यालागीं आकार माझ्या दिलास
तुझ्या वंदितो माउली पाउलांस
गुरु आद्य तू माझिया जीवनात
तुवा पेरिली धर्मबीजे मनात
प्रपंचात सतपंथ तू दविलास ।। १ ।।
तुझ्या कीर्तीविस्तार माझा प्रपंच
कृपेने तुझ्या रंगला रंगमंच
वठे भूमिका पाठ जैसा दिलास ।। २ ।।
उमेचे, रमेचे, जसे शारदेचे
जपध्यान तैसे तुझे जन्मदेचे
तुझ्या प्रेरणेने यशस्वी प्रवास ।। ३ ।।