सोमवार, १८ डिसेंबर, २००६

कणा - कुसुमाग्रज

कणा

‘ओळखलत का सर मला?’ - पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून :
‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.
कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे,
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
‘पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला.
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, फक्‍त लढ म्हणा’!

३६ टिप्पण्या:

  1. खुप छान कविता आहे शालेय जिवनापासून माझी पाठ आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. अप्रतिम कविता आहेत.निरोप समारंभ मध्ये विद्यार्थ्यांसाठी नेहमी मी म्हणत असतो. आणि शेवटी विद्यार्थ्यांना आपला कणा कसा ताट ठेवायचा याचे अप्रतिम उदाहरण म्हणजे कणा कविता.सलाम पुन्हा एकदा कुसुमाग्रजांना.

    उत्तर द्याहटवा
  3. मी खूप वेळा पाहतोय ही कविता खूप मस्त आणि मला खूप आवडते

    उत्तर द्याहटवा
  4. आयुष्याच्या दुःख दायी वळणावर्ती सुद्धा कणा ताठ ठेवण्याचे धाडस प्राप्त होते

    खरचं खूपच प्रेरणा देते ,,,,

    मला शाळेत असताना तिचा अर्थ समजत नव्हता पण आता मात्र तो नक्कीच कळतो , कारण आता स्वतः आयुष्य अनुभवतोय,,,,,

    उत्तर द्याहटवा
  5. खूपच सुंदर
    थोड्या शब्दात खुप काही सांगून जाते ही कविता

    उत्तर द्याहटवा
  6. अप्रतिम कविता आहे .कवी कुसुमग्रज यांनी अतिशय आशयपूर्ण शब्दात भावना व्यक्त केल्या आहेत.प्रत्येक व्यक्तीला जीवनात काही ना काही दुःख असते अशा प्रसंगात ही कविता प्रेरणादायी वाटते .

    उत्तर द्याहटवा
  7. अप्रतिम शिक्षण व शिक्षक यांना समर्पित

    उत्तर द्याहटवा
  8. मनाला स्पर्श करणारी शब्द रचना

    उत्तर द्याहटवा
  9. अचानक मुलगा गेला.पण ही कविता आठवली आणि परत आत्मिक हिंमत मिळाली.आजच्या आधुनिक काळात अश्या कवितांची शिकवण मुलांना मिळाली पाहिजे.

    उत्तर द्याहटवा
  10. कविता खूप छान आहे मी माझ्या स्कूल मध्ये कविता म्हटली आणि मला याच्या मध्ये एक नंबर चे बक्षीस मिळाले.

    उत्तर द्याहटवा
  11. Khupach Chan Kavita aahe mi Kavi Kusumagrajancha abhari aahe, pratyakshya jivan shabdantun avatarale ase vatate

    उत्तर द्याहटवा