बुधवार, १० जानेवारी, २००७

आजीचे घड्याळ - केशवकुमार

आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक,
देई ठेवुनि तें कुठे अजुनि हे नाही कुणा ठाउक;
त्याची टिक टिक चालते न कधिही, आहे मुके वाटते,
किल्ली देई न त्यास ती कधि, तरी ते सारखे चालते

"अभ्यासास उठीव आज मजला आजी पहाटे तरी,"
जेव्हा मी तिज सांगुनी निजतसे रात्री बिछान्यावरी
साडेपाचही वाजतात न कुठे तो हाक ये नेमकी
"बाळा झांजर जाहले, अरवला तो कोंबडा, उठ की !"

ताईची करण्यास जम्मत, तसे बाबूसवे भांडता
जाई संपुनियां सकाळ न मुळी पत्त कधी लागता !
"आली ओटिवरी उन्हे बघ!" म्हणे आजी, "दहा वाजले !
जा जा लौकर !" कानि तो घणघणा घंटाध्वनी आदळे.

खेळाच्या अगदी भरांत गढुनी जाता अम्ही अंगणी
हो केव्हा तिनिसांज ते न समजे ! आजी परी आंतुनी
बोले, "खेळ पुरे, घरांत परता ! झाली दिवेलागण,
ओळीने बसुनी म्हणा परवचा ओटीवरी येउन !"

आजीला बिलगून ऐकत बसू जेव्हा भुतांच्या कथा
जाई झोप उडून, रात्र किती हो ध्यानी न ये ऐकता !
"अर्धी रात्र कि रे" म्हणे उलटली, "गोष्टी पुरे ! जा पडा !'
लागे तो धिडधांग पर्वतिवरी वाजावया चौघडा

सांगे वेळ, तशाच वार-तिथीही आजी घड्याळातुनी
थंडी पाऊस ऊनही कळतसे सारें तिला त्यांतुनी
मौजेचे असले घड्याळ दडुनी कोठे तिने ठेविले?
गाठोडे फडताळ शोधुनि तिचे आलो ! तरी ना मिळे !

२६ टिप्पण्या:

  1. बाबांच्या तोंडून किती वेळा पहिली ओळ ऐकली पण पूर्ण कविता कुठेच मिळाली नाही. पोस्ट करण्याबद्दल खूप खपू धन्यवाद.

    - आशय नाईक

    उत्तर द्याहटवा
  2. शाळेत एकदा शिकलो होतो ही कविता. तेंव्हाही छान वाटली होती आणि आताही.

    उत्तर द्याहटवा
  3. आज नातवाला गोष्ट सांगताना ही कविता मिळाली. छान वाटले.

    उत्तर द्याहटवा
  4. आज नातवाला गोष्ट सांगताना ही कविता मिळाली. छान वाटले.

    उत्तर द्याहटवा
  5. आज नातवाला गोष्ट सांगताना ही कविता मिळाली. छान वाटले.

    उत्तर द्याहटवा
  6. शाळेत शिकलेली ही सर्वात आवडती कविता

    उत्तर द्याहटवा
  7. सर,मला बिछान्यावरी म्हणजे नेमके कुठे

    उत्तर द्याहटवा
  8. आईने आठवण काढताच मिळाली.... तुमच्या मुळे.
    आभार.

    उत्तर द्याहटवा
  9. प्रत्युत्तरे
    1. पूर्वीच्या काळी ज्या वेळी घड्याळे नव्हती त्या वेळी आजी,आजोबा किंवा मोठी माणसे सूर्याच्या उन्हाकडे आणि सावलीकडे पाहून अंदाजाने किती वाजले हे बरोबर सांगत. आजीचे घड्याळ म्हणजे आजीचे अनुभवाचे ज्ञान !

      हटवा
  10. माझ्या आजीने लहानपणी शिकवली मला ही कविता. आजीला जाऊन एक वर्ष पूर्ण झालं. आज परत म्हणताना खूप छान वाटलं.

    उत्तर द्याहटवा
  11. शाळेचे ते दिवस आठवले फार छान वाटले. धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
  12. शाळेचे ते दिवस आठवले फार छान वाटले. धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
  13. संग्रही ठेवावी आणि कधीही वाचावी. मन कित्येक वर्ष मागे जातं आणि शाळेच्या आठवणी ताज्या करत.

    उत्तर द्याहटवा
  14. आमच्या चौथीच्या नेरुरकर पुस्तकांतली पांचव्या धडयांतली कविता. कांही आठवायच्या कांही विसरायला झालेल्या. मला आतां आठवण झाली म्हटलं वेब आहे का बघूंया. आणि सापडली याचा मला किती आनंद झाला सांगता येत नाही, आपण पोस्ट केल्या बद्दल धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  15. एक अप्रतिम कविता.आपण घड्याळाचे किती गुलाम झालोय ते दाखविणारी.निसर्गाचे चक्र अनुभवणे हेच विसरलोय.

    उत्तर द्याहटवा
  16. सन १९४५-४६ इयत्ता २री नाना लेले मास्तरांची खाजगी ४थी पर्यंतची शाळा.२-३-४ पहिल्या माळ्यावर एका खोलीत ३ वर्ग. २रीचा जमीनीवर जाजमावर,३रीचा डावीकडे बाकड्यावर व ४थीचा उजवीकडे बाकड्यावर.जाजमाच्या समोर लेले मास्तरांचे टेबल खुर्ची टेबलावर आंखणी रूळ मुलांना शिक्षेसाठी. मुलगे+मुली मिक्स शाळा. प्रत्ये वर्गात १२-१५ स्नातक. तेव्हां ही माझी आवडती कविता बालमराठी पुस्तकातील. कायम लक्षांत राहिलेली.

    उत्तर द्याहटवा
  17. माझी आई व आजी कोंबडा आरवला की आम्हा मुलांना उठवायची. त्याच वेळेस भिवंडीतील कोंडवाड्यातील व बाजारपेठेतील पिंपळाच्या झाडावरील मोठ्या घंट्यांचे टोले पडायचे . ती उठण्याची वेळ मेंदूत आज वयाच्या ८३-८४ वर्षापर्यंत कायम आहे.

    उत्तर द्याहटवा
  18. जिच्या जवळ राहत असतांना ही कविता शिकलो, ती आजी गेली तेव्हा याच चमत्कारिक घड्याळाची टिक टिक थांबल्याची जाणीव झाली. आता जेव्हा जेव्हा तिची आठवण येते तेव्हा तेव्हा या कवितेतले शब्द ओठांवर येतात...

    उत्तर द्याहटवा