मंगळवार, २३ जानेवारी, २००७

तेच ते नि तेच ते - विंदा करंदीकर

सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते !! तेच ते !!
माकडछाप दंतमंजन,
तोच चहा तेच रंजन
तीच गाणी तेच तराणे,
तेच मूर्ख तेच शहाणे
सकाळपासुन रात्रीपर्यंत
तेच ते तेच ते

खानावळीही बदलून पाहिल्या
कारण जीभ बदलणं शक्य नव्हतं.
काकू पासून ताजमहाल,
सगळीकडे सारखेच हाल
नरम मसाला, गरम मसाला,
तोच तो भाजीपाला
तीच ती खवट चटणी,
तेच ते आंबट सार
सुख थोडे दु:ख फार

संसाराच्या वडावर स्वप्नांची वटवाघुळे
त्या स्वप्नाचे शिल्पकार,
कवि थोडे कवडे फार
पडद्यावरच्या भूतचेष्टा;
शिळा शोक, बुळा बोध
नऊ धगे एक रंग,
व्यभिचाराचे सारे ढंग
पुन्हा पुन्हा तेच भोग
आसक्तीचा तोच रोग
तेच ' मंदिर ' तीच ' मूर्ती '
तीच ' फुले ' तीच ' स्फुर्ती '
तेच ओठ तेच डोळे
तेच मुरके तेच चाळे
तोच पलंग तीच नारी
सतार नव्हे एकतारी

करीन म्हटले आत्महत्त्या
रोमिओची आत्महत्त्या
दधीचिची आत्महत्त्या
आत्महत्त्याही तीच ती
आत्मा ही तोच तो
हत्त्याही तीच ती
कारण जीवनही तेच ते
आणि मरणही तेच ते

१० टिप्पण्या:

  1. खूप छान आहे ही कविता. आधी वाचली नव्हती. तुमच्या ब्लॉगमुळे नवीन कवितांशी ओळख होतीये. पोस्ट केल्याबद्दल धन्यवाद!

    उत्तर द्याहटवा
  2. ज्ञानपीठ पुरस्कारविजेते!!! उगाच नाही!!

    उत्तर द्याहटवा
  3. सध्या ही कविता खरोखरच लागू पडते.विंदांची कविता कालातीत आहे.

    उत्तर द्याहटवा
  4. शाळेत असताना ही कविता होती
    कोणत्या इयत्ता आठवत नाही।

    काही ओळी सहज आठवल्या।
    Gugal वर पहावयास मिळाली।

    धन्यवाद





    उत्तर द्याहटवा
  5. खूप छान कविता आहे बिंदा हे त्यांच्या कवितेच्या माध्यमातून मनाला भिडतात

    उत्तर द्याहटवा