मंगळवार, ३० जानेवारी, २००७

त्रिवेणी १ - शांता शेळके

कवी गुलज़ार ह्यांच्या शांताबाईंनी अनुवादित केलेल्या हया काही त्रिवेणी

१. किती दूरपर्यंत होता तो माझ्याबरोबर, आणि एके दिवशी
मागे वळून बघतो तर तो आता सोबत नव्हता!

खिसाच फाटका असेल तर काही नाणी हरवूनही जातात!

२. कितीतरी आणखी सूर्य उडाले आकाशात
मी आकाशाचे गूढ उकलत होतो

ती टॉवेलने केस झटकत होती...

३. रांगेत ठेवलेल्या पुस्तकांची पाने फडफडू लागली अचानक
हवा दार ढकलून थेट आत घुसली

हवेसारखी तुही कधीतरी इथे ये-जा कर ना!

४. झुंबराला हलकेच स्पर्श करीत हवा वावरते घरात
तेव्हा तुझ्या आवाजाचेच जणु शिंपण करत रहाते

गुदगुल्या केल्या की तू अशीच खुदखुद् हसायचीस ना?

५. ईतक्या सावधगिरीने चंद्र उगवला आहे आभाळात
जशी रात्रीच्या काळोखात खिडकीशी येतेस तू

काय?! चंद्र आणि जमीन ह्यांच्यातही आहे काही आकर्षण?

६. अशा रणरणत्या उन्हातही एकटा नव्हतो मी
एक सावली माझ्या आगे-मागे धावत होती सारखी

तुझ्या आठवणीने एकटे राहूच दिले नाही मला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा