गुरुवार, १ मार्च, २००७

रांगोळी घातलेली पाहून - राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज

"साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे;
नित्याच्या अवलोकने परि किती होती जगी आंधळे!
रांगोळी बघुनी इत:पर तरी होणे तयी शाहणे,"
रांगोळी बघुनीच केशवसुता हे आठवे बोलणे.

रांगोळीत तुझ्या विशेष गुण जो आर्या! मला वाटतो,
स्पष्टत्वे इतुक्या अशक्य कथणे वाटे तुला काय तो?
जो तूते वदवे न अर्थ मनिचा तोंडात आला तरी,
तो मी बोलुनि दाखवीन अगदी साध्याच शब्दी परी.

चैत्री आंगण गोमये सकलही संमार्जिले सुंदर,
रांगोळीहि कुणी तिथे निजकरी ती घातली त्यावर.
ज्यां आमंत्रण त्या घरी मुळि नसे ऐशा स्त्रियांलागुनी
त्या चिन्हांतुनि हा विशेष निघतो आहे गमे मन्मनी-

या या! आज असे सुरेख हळदीकुंकू पहा या स्थली
बत्तासे बहु खोबरे हरभरे खैरात ही चालली!
ठावे कोण न जात येत- दिधले कोणास आमंत्रण;
नाही दाद घरात ही मुळि कुणा; दे धीर हे लक्षण.

संधी टाकुनि छान फौज तुमची कोठे पुढे चालली?
बायांनो! अगदी खुबी विसरता तैलंगवृत्तीतली !
नाते, स्नेह, निदान ओळख तुम्हा येथे न आणी तरी,
या; आमंत्रण राहुं द्या; परि शिरा सार्‍याजणी या घरी!

लाभे ते फुकटातलेच हळदीकुंकू तुम्हाला जरी,
होई काय नफा अचानक तयामाजी न कित्तीतरी?
ही आगंतुकवृत्ति आपण जरी धिक्कारिली यापरी,
प्राप्ती चार घरे उगीच फिरुनी होईल का हो तरी?

चाले काय असे उगीच भिऊनी? तुम्हीच सांगा खरे!
या डोळा चुकवून नीट; डरतां आता कशाला बरे?
कोणाच्या नजरेत येइल तरी होणे असे काहि का?
केला का खटला कुणावर कुणी ऐसा अजुनी फुका!

बायांनो! तर या, नकाच दवडू संधी अशी हातची,
जा जे काही मिळेल तेच भरल्या रस्त्यातुनी खातची!
कामे ही असली हितावह कधी होतील का लाजुनी?
या-या-या तर धावुनी; त्यजु नका रीती पुराणी जुनी!

कोणाच्या घरचे असेल हळदीकुंकू कधी नेमके
ज्या बायांस नसेल हे चुकुनिया केव्हा तरी ठाउके,
रांगोळी बघुनी इत:पर तरी होणे तयी शाहणे,
कोठे चालत काय काय अगदी हे नेहमी पाहणे!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा