मंगळवार, ६ मार्च, २००७

चिमणीचा घरटा - बालकवी

चिंव् चिंव् चिंव् रे । तिकडे तू कोण रे?

'कावळे दादा, कावळे दादा, माझा घरटा नेलास, बाबा?'
'नाही ग बाई, चिऊताई, तुझा घरटा कोण नेई?'

'कपिला मावशी, कपिला मावशी, घरटे मोडून तू का जाशी?'
'नाही ग बाई मोडेन कशी? मऊ गवत दिले तुशी'

'कोंबडी ताई, कोंबडी ताई, माझा घरटा पाहिलास बाई?'
'नाही ग बाई मुळी नाही तुझा माझा संबंध काही?'

'आता बाई पाहू कुठे? जाऊ कुठे? राहू कुठे?'
'गरीब बिचाऱ्या चिमणीला सगळे टपले छळण्याला'

चिमणीला मग पोपट बोले ' का गे तुझे डोळे ओले?'
'काय सांगू बाबा तुला? माझा घरटा कोणी नेला?'

'चिमूताई चिमूताई, माझ्या पिंजऱ्यात येतेस, बाई?'
'पिंजरा किती छान माझा! सगळा शीण जाईल तुझा'

'जळो तुझा पिंजरा मेला! त्याचे नाव नको मला !'
'राहीन मी घरट्याविना!' चिमणी उडून गेली राना.

११ टिप्पण्या:

  1. *घरटे नसले तरी चालेल,पण कोणाचीही गुलामगिरी नको स्वतंत्रता हवी.*

    उत्तर द्याहटवा
  2. स्वाभिमानी चिमणी यात छान नमूद केली आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. घरटे तर हवेच ... कारण तिचा तो पहिला अधिकार आहे . मात्र तिला गुलामगिरीही नकोय .. स्वातंत्र्य हवे .

    उत्तर द्याहटवा
  4. खुप शोधत होते हि कविता. मुलींना सांगण्यासाठी. कवी कोण हे ही विसरले होते. शाळेच्या पाठ्यपुस्तकात होती. खुप खुप आभार

    उत्तर द्याहटवा
  5. खुप खुप शोधत होते ही कविता. धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
  6. मला शालेय जीवनात ही कविता होती आणि चिमणीला मग पोपट बोले इथपासून पुढची सगळी कविता मला अजुनही तोंडपाठ आहे. तशा मला लहानपणी अभ्यासलेल्या खुप साऱ्या कविता अजुनही चांगल्या पाठ आहेत.

    उत्तर द्याहटवा
  7. ही कविता वाचून शालेय जीवनातील दिवस आठवले खूप छान.

    उत्तर द्याहटवा