मंगळवार, १० एप्रिल, २००७

उत्तररात्र ओलांडून - बा. भ. बोरकर

उत्तररात्र ओलांडून खुळे चांदणे घरात आले
गाढ झोपेत मूल मूल दवामधले फूल झाले
आई त्यांची हिरवी वेल पान्पान आळसलेली
स्वप्नपत्री खुडत असताना मोतीचूर पावसात न्हाली
सोनदिवीचे पाचही डोळे जागून झाले मंद मंद
गार झोंबरा वारा आला घरात ओतीत धुंद गंध
मीच तेव्हढा जागा झालो गगनभर पांगली वीज
अकस्मात नागीण कशी प्राण चाटून गेली वीज
अंधारातल्या पारिमीता संपून उजळ झाली शुद्ध
शिळ्यापाक्या सुखाखाली उपासपोटी दिसला बुद्ध
खिडकीमधून उडत आले बोलले कोवळे पिंपळपान
" पावस-पाण्यात पिकली पुनव चल लवकर वेचून आण "
वेडे पाय चालू लगले तोच जूनी आठवण झाली
उंबरठ्यापाशी कपाळभर दरदरून हूम आली
तसाच फिरुन वारें कसा जागवले मी सारे घर
त्याच्या संगे वेचली पुनव चूर होऊन रात्रभर
रोज चांदणे घरांत येते फुलतो संसार पिंपळ कसा
कवडसासा अजून बुद्ध बसून आहे उघडून पसा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा