मंगळवार, १५ मे, २००७

या नभाने या भुईला दान द्यावे - ना. धों. महानोर

या नभाने या भुईला दान द्यावे
आणि या मातीतून चैतन्य गावे
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लगडून जावे

या नभाने या भुईला दान द्यावे
आणि माझ्या पापणीला पूर यावे
पाहता सुगंध कांती सांडलेली
पाखरांशी खेळ मी मांडून गावे

गुंतलेले प्राण या रानात माझे
फाटकी ही झोपडी काळीज माझे
मी असा आनंदुन बेहोष होता
शब्दगंधे तू मला वाहून घ्यावे

1 टिप्पणी:

  1. आम्हाला शाळेत होती ही कविता. पण पाठ्यपुस्तकं आणि परिक्षेतले प्रश्नही हिला डागाळू शकले नाहीत. काही ओळी कायम स्मरणात राहील्या. विशेषतः "कोणती पुण्ये अशी येती फळाला
    जोंधळ्याला चांदणे लगडून जावे"
    शेतमळा किंवा निसर्गाशीच नाही तर सर्व चराचराशी नातं सांगणारा, नाळ जोडणारी ही जाणीव आहे. असे क्षण आपल्या आयुष्यातही येतात. पण कवींच्या हातात ते काही देऊनही जातात. ती ही शिल्लक आहे!

    उत्तर द्याहटवा