शुक्रवार, १८ मे, २००७

तांबे-सोन्याची नांदी - ग्रेस

निळसर डोंगर घळीघळीतुन धूर धुक्याचा निघत असे
खेड्यामध्ये गांव पुरातन तसा वसविला मला दिसे

खडकसांधणी परी नदीचे वळण पुलातुन निघे पुढे
पारदर्शनी पाण्याखालून माशांचाही जीव रडे

हातामध्ये रिक्त कमंडलु, तहान गळ्यावर घे जोगी
गावापासुन दूर अरण्ये वणवा वणव्याच्या जागी

अग्नीशी संगनमत सोडूनिया वाराही ईकडेच फिरे
पंथ सोडुनी जशी प्रणाली एकट कवितेतून झरे

मनगट उसवी लख्ख तांबडे कडे चमकते की जळते
जळते तांबे कनकदिप्तीवर खरेच का सोने होते?

वाळुवरुनी पाय उचलिता गुडघे कोपर झांझरती
मेंदुमधुनी शिळा अहिल्या झर्रकन ये चरणावरती

इथे मेघ झरण्याच्या पुर्वी वाकुन बघतो रे खाली
पात्र नदीचे किती भयंकर किती तळाची रे खोली?

उडे कावळा चिमण्यांनीही भुर्रकन अंगण सावरले
खेड्यामधले गावामधले लोक भाबडे बावरले

३ टिप्पण्या:

  1. ग्रेसची कविता म्हणजे माझा एकदम weakpoint आहे...though this doesn't appeal to me much:(
    कश्यातली आहे ही?

    उत्तर द्याहटवा
  2. ही कविता मौजेच्या दिवाळी २००६ अंकात प्रकाशित झाली आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. पद्माकर आणि किरण - अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद आले तर निराश होऊ नका. इतरांच्या कविता इथे टाकण्याची मेहनत घेताय - या वाक्यातच तुमचा निरपेक्षपणा सिद्ध होतोय.
    Keep it up.
    एक सुचना - शुद्धलेखनाच्या चुका टाळा. विशेषत: कवितांच्या बाबतीत एखाद्या शब्दा/अक्षराच्या फेरफारीने अर्थ बदलतो.

    उत्तर द्याहटवा