गुरुवार, १२ जुलै, २००७

त्रिधा राधा - पु.शि. रेगे

आभाळ निळे तो हरि,
ती एक चांदणी राधा,
बावरी,
युगानुयुगीची मनबाधा

विस्तीर्ण भुई गोविंद,
क्षेत्र साळीचे राधा,
संसिद्ध,
युगानुयुगीची प्रियंवदा

जलवाहिनी निश्चल कृष्ण,
वन झुकले काठी राधा,
विप्रश्न,
युगानुयुगीची चिरतंद्रा

८ टिप्पण्या:

  1. लिलीची फुले तिने
    एकदा चुंबिता, डोळां
    पाणी मी पाहिले....!

    लिलीची फुले आता
    कधीही पाहता, डोळां
    पाणी हे साकळे....!

    - पु. शि. रेगे

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. प्रेमभावना व विरह भावना व्यक्त करणारी कविता.
      ससंवेदना ही भावना कवितेला जन्म देते.

      हटवा
  2. तहान
    सारा अंधारच प्यावा

    अशी लागावी तहान,

    एका साध्या सत्यासाठी

    देता यावे पंचप्राण ।।

    व्हावे एव्हढे लहान

    सारी मने कळों यावी,

    असा लागावा जिव्हाळा

    पाषाणाची फुले व्हावी ।।

    फक्त मोठी असो छाती

    सारे दुःख मापायला

    गळो लाज गळो खंत

    काही नको झाकायला ।।

    राहो बनून आभाळ

    माझा शेवटला श्वास

    मना मनात उरो

    फक्त प्रेमाचा सुवास ।।

    - म. म. देशपांडे.

    उत्तर द्याहटवा
  3. कोठुनि येते मला कळेना
    उदासीनता ही हृदयाला
    काय बोचते ते समजेना
    हृदयाच्या अंतर्हृदयाला ।।

    येथे नाही तेथे नाही,
    काय पाहिजे मिळावयाला?
    कुणीकडे हा झुकतो वारा?
    हाका मारी जीव कुणाला?

    मुक्या मनाचे मुके बोल हे
    घरे पाडिती पण हृदयाला
    तीव्र वेदना करिती, परि ती
    दिव्य औषधी कसली त्याला !

    - बालकवी

    उत्तर द्याहटवा
  4. तुमचा उपक्रम चांगला आहे. वरील कविता तुमच्या संग्रहासाठी.

    उत्तर द्याहटवा
  5. http://iforeye.blogspot.com/2012/02/blog-post_18.html

    Thanks a lot for compiling the collection.

    Ranjan

    उत्तर द्याहटवा