सोमवार, १५ सप्टेंबर, २००८

निरोप - कुसुमाग्रज

( पुढील कविता ही माझा मित्र आणि ह्या संग्रहाचा सह-संकलक - किरण रानडे - ह्याच्या आईच्या स्मरणानुसार उद्धृत करीत आहे. जाणकारांकडून सुधारणांची अपेक्षा आहे. माझे श्वसुर - श्री. शशिकांत दात्ये - ह्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ह्या कवितेची पार्श्वभूमी ही फाळणीच्या काळात पूर्व पाकिस्तानात घडलेल्या एका प्रसंगाची आहे. पूर्व पाकिस्तानातून फाळणीनंतर भारतात यायला निघालेल्या एका विमानात एक माता आपल्या कोवळ्या मुलाला सोडून देते, असा काहिसा तो प्रसंग होता. ह्याही संदर्भात कुणा जाणकार रसिकांस काही माहिती असेल तर ती अवश्य द्यावी.)

गर्दीत बाणासम ती घुसोनि
चाले, ऊरेना लव देहभान
दोन्ही करांनी कवटाळूनीया
वक्ष:स्थळी बालक ते लहान

लज्जा न, संकोच नसे, न भीती
हो दहन ते स्त्रीपण संगरात
आता ऊरे जीवनसूत्र एक
गुंतोनी राहे मन मात्र त्यात

बाजार येथे जमला बळींचा
तेथेही जागा धनिकांस आधी
आधार अश्रूसही दौलतीचा
दारिद्र्य दु:खा दुसरी उपाधी

चिंध्या शरीरावरी सावरोनी
राहे जमावात जरा उभी ती
कोणी पहावे अथवा पुसावे?
एकाच शापातून सर्व जाती

निर्धार केला कसला मानसी
झेपाउनी ये ठिणगीप्रमाणे
फेकूनिया बाळ दिले विमाने
व्हावे पुढे काय प्रभूच जाणे

"जा बाळा जा, वणव्यातुनी या
पृथ्वीच आई पुढती तुझी रे
आकाश घेईं तुजला कवेंत
दाही दिशांचा तुज आसरा रे"

ठावे न कोठे मग काय झाले
गेले जळोनीं मन मानवाचे
मांगल्य सारे पडले धुळीत
चोहीकडे नर्तन हिंस्त्रतेचे!

४ टिप्पण्या:

  1. hi kavita kusumagrajaNchi aahe. phaaLaNeecyaa parshvavhoomeevarachee. majhyakade kadachit purn kavita asel.

    उत्तर द्याहटवा
  2. kavita kusumagrajanchi aahe

    nav phalni nsun Nirop aahe
    pachve kadve Khalil pramane

    Nirdhar kela kasala manasi
    zhepauniye thinagi pramane
    phekuniya bal dile vimane
    vavhe pudhe kay prabhuch jane

    उत्तर द्याहटवा
  3. महोदया गौरी/सुजाता, आपल्या शेऱ्यांबद्दल धन्यवाद.
    सुजाताजी, आपण सुचवलेली दुरुस्ती केली आहे. गौरीजी, आपल्याकडे कविता असल्यास तपासून दुरुस्ती सुचवावी!

    उत्तर द्याहटवा
  4. ओरिजनल कविता वाटत नाही
    1965 चे दरम्यान हायस्कूलमध्ये ही कविता शिकलोय आठवते तरीही ओरिजनल वाटतो नाही.
    निधार केला कसला मनाशी"या कडव्यात झाला इशारा जाना दूर झाले असे काहीसे आठवते.
    त्यामुळे मूळ कविता पाहण्याची खूप इच्छा आहे.
    त्यात या करण्याच्या काळात प्रत्येक पेशंट आणि त्याच्या नातेवाइकांना ची अगतिकता पाहिल्यावर या कवितेतील"बाजार येथे जमला बळींचा ही जागा धनिकास आधी
    आधार अश्रू सही दौलतीचा दारिद्र्य दुखा दुसरी उपाधी
    हेच वर्णन भावून जाते

    उत्तर द्याहटवा