बुधवार, २४ सप्टेंबर, २००८

गवतफुला - इंदिरा संत

गवतफुला

रंगरंगुल्या, सानसानुल्या,
गवतफुला रे गवतफुला;
असा कसा रे सांग लागला,
सांग तुझा रे तुझा लळा.

मित्रासंगे माळावरती,
पतंग उडवित फिरताना;
तुला पाहिले गवतावरती,
झुलता झुलता हसताना.

विसरुनी गेलो पतंग नभिचा;
विसरून गेलो मित्राला;
पाहुन तुजला हरवुन गेलो,
अशा तुझ्या रे रंगकळा.

हिरवी नाजुक रेशिम पाती,
दोन बाजुला सळसळती;
नीळ निळुली एक पाकळी,
पराग पिवळे झगमगती.

मलाही वाटे लहान होऊन,
तुझ्याहुनही लहान रे;
तुझ्या संगती सडा रहावे,
विसरून शाळा, घर सारे.

३ टिप्पण्या:

  1. हि कविता अर्धवट आहे. माझ्या माहितीतील पूर्ण कविता मी खाली देत आहे.

    रंगरंगुल्या, सानसानुल्या,
    गवतफुला रे गवतफुला;
    असा कसा रे मला लागला,
    सांग तुझा रे तुझा लळा.

    मित्रासंगे माळावरती,
    पतंग उडवित फिरताना;
    तुला पाहिले गवतावरती,
    झुलता झुलता हसताना.

    विसरुनी गेलो, पतंग नभीचा,
    विसरून गेलो मित्राला;
    पाहून तुजला हरखुन गेलो,
    अशा तुझ्या रे रंगकळा.

    हिरवी नाजुक, रेशिम पाती,
    दोन बाजुला सळसळती;
    नीळ निळुली एक पाकळी,
    पराग पिवळे झगमगती.

    तळी पुन्हा अन गोजिरवाणी,
    लाल पाकळी खुलते रे;
    उन्हामध्ये हे रंग पाहता,
    भानच हरपुनी गेले रे

    पहाटवेळी आभाळ येते,
    लहान होउनी तुझ्याहुनी;
    तुला भरविते निळ्या करांनी,
    दवमोत्यांची कणी कणी.

    वारा घेवूनी रूप सानुले,
    खेळ खेळतो झोपाळा;
    रात्रही इवली होऊन म्हणते
    अंगाईचे गीत तुला.

    गोजिरवाणा हो रवीचा कण
    छाया होते इवलीशी;
    तुझ्या संगती लपून खेळते,
    रमून जाते पहा कशी.

    तुझी गोजिरी, शिकून भाषा,
    गोष्टी तुजला सांगाव्या;
    तुझे शिकावे खेळ आणखी,
    जादू तुजला शिकवाव्या.

    आभाळाशी हट्ट करावा
    खाऊ खावा तुझ्यासवे;
    तुझे घालुनी रंगीत कपडे,
    फुलपाखरां फसवावे.

    मलाही वाटे लहान व्हावे
    तुझ्याहूनही लहान रे;
    तुझ्या संगती सदा रहावे,
    विसरुनी शाळा घर सारे

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. कवीने गवतफुलसाठी काय विशेषणे वापरली आहे

      हटवा
    2. रंगरंगुल्या सानसानुल्या ही विशेषणे कवीने गवतफुलासाठी वापरली आहे.

      हटवा