कांहीं गोड फुलें सदा विहरती स्वगागनांच्या शिरीं,
कांहीं ठेवितसे कुणी रसिकही स्वच्छंद हृन्मंदिरीं;
कांहीं जाउनी बैसती प्रभुपदीं पापापदा वारि तें,
एकादें फुटकें नशीब म्हणुनी प्रेतास शृंगारितें ।
कोणी पर्वत आपुल्या शिरिं धरि हैमप्रभा शीतला,
कोणाच्या उदरामधून निघती मोठया नद्या निर्मला;
कोणाला वनदेवता वरितसे मोदांत जी नाहते,
एकाद्यामधुनी परंतु जळती ज्वालानदी वाहते !
झाडें जोडुनी पत्रयुग्म फुटले मेघांप्रती याचती,
स्वच्छंदें जलबिंदु तोंच सगळ्या पानांवरी नाचती;
सारी पालवती, फुलें विहरती, शोभा वरी लोळते,
एखाद्यावर मात्र वीज पडुनी त्या जाळते पोळते !
चाले खेळ असा जगांत; बहुधा सौख्यांत सारे जरी,
एखादा पडतो तसाच चुकुनी दुःखार्णवीं यापरी
पाही कोण अशा हताश हृदया ? जो तो असे आपला,
देवा ! तूं तरि टाकिं अश्रु वरुनी, त्यासाठीं तो तापला !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा