अयि नरांग-मल-शोणित-भक्षिके,
जनु-विनाशक-जंतु-सुरक्षिके!
असु-परीक्षित-हारक-तक्षिके,
'क्या हुवा अफसोस!' मक्षिके
या प्रभातसमयास मंगल,
चमकती दंवमौक्तिक निर्मल,
गात पक्षिगण हा गगनी फिरे,
पण दशा तव काय अर-अरे!
ओसरीवरुनि या तव मैत्रिणी
गात स्वैर फिरतात सुलक्षणी
परि तुला न बघती मुळि ढुंकुनी
'संकटी जगि कुणा न असे कुणी!'
मंडई नव्हति का तुज मोकळी,
की मिठाइ 'मघुरा-भुवनांतली,
नव्हति का 'उपहार-गृहे' खुली,
म्हणुनि आलिस शहरातिल बोळ ते,
मनुजवस्तित आलिस का इथे!
करीत 'दत्तु-भट' काय तपासणी
म्हणुनि घाबरुनि आलिस तू झणी!
शर्कराकण येथिल सांडले
सेवुनी न तुज सौख्य जाहले?
की 'यमी' करिंचे गुळखोबरे,
शमवि भूक न काय तुझी बरे?
पेय बोलुनिचालुनि घातकी,
बुडविते बघ भारतियास की,
या अशा व्यसनात विलायती,
अडकता फळ दारुण शेवटी !
नर जसा बुडतो भवडोही
तेवि खालिवर जासि अयाई!
काडि वाचवि जरी बुडत्याला,
काडिचा न परि आश्रय गे तुला!
स्थिति तुझी करुणास्पद ही अशी.
बघु तरी उघड्या नयनी कशी?
अंगि तेवि भरले भयकापरे,
आणि त्यात निवला न चहा बरे!
हाय! सोडुनि जाशिल ना अम्हा,
छे, सले नुसती मनि कल्पना?
समिप पाउसकाळहि पातला,
आणि तू निघुनि जाशिच आजला!
अहह, आम्रफल-मोसम येईल,
अम्हि असू परि तू नसशील!
फेकु सालटि चोखुनि चोखुनि,
तुजविना पण जातिल वाळुनी
तुजविना कवि-मुखे दिसतील की,
भृंगहीन कमळांसम ती फिकी,
कौन्सिलात, सभासद आणी,
मारतील कवणा तुजवाचुनी?
राजकारण रोज नवे नवे,
राष्ट्रभक्त करण्यास तयार हे.
शिंकुनि अहह! देइल त्यापुढे,
त्या इशारत कोण तरी गडे?
यापरी नव-तरंग मनात
येउनी ह्रदय होय कंपित.
पेयपृष्ठि उठली इतुक्यात,
मंद-श्वास,-लहरीसह लाट!
फड फड फड पंखा हालवी ती तराया,
तडफड बहु केली जाहले कष्ट वाया,
मिटवुनि इवलेसे पाय, ती शांत झाली,
अहह, तडक आणी खालती खोल गेली!
टाकुनी लांब सुस्कार, उमाळा दाबुनी उरी,
चहा तो शांत चित्ताने प्राशिला वरचेवरी.
ही कविता माझी आवडती । प्र के अत्र्यांचं हे विडंबन काव्य फारच अप्रतिम आहे.
उत्तर द्याहटवाआचार्य प्रल्हाद केशव अत्रे केशवकुमारांची ही कविता फारच सुंदर आहे. एक इवलीशी माशी मक्षिका जेथे घाण, अस्वच्छ ठिकानी तर आहेच पण मंडईतील भाजीपाला,मिठाईचे दुकान खाऊगल्लीतील गाड्या,मधुरभवन सारखे हाॅटेल्स्,दत्तुभटाची चौकस दृष्टी,एवढेच काय लोकसभेत व विधानसभेत चर्चेचे वेळी सतत तुला हाकणारे आमदार, खासदार या सार्यांना सोडुन तु आंकड़े शहरातील वस्तीत आलीस व काय दुर्भाग्य पहा हरयाणवी चहाच्या कपावर घिरट्या घालतांना त्यातील गरम वाफेने तु भाजलीस, तुझे पंख फडकवलेस पण हाय! त्या कपात पडलीस पण आनंदाने मौजमजा करणारे कोणाचेही तुझ्याकडे लक्ष नाही खरेच हे जग किती स्वार्थी आहे अखेर तु चहाने भरलेल्या कपाच्या तळासी गेलीस पण कोणालाही त्याचे कांहीच वाटले नाही त्यांनी वरवरचा चहा पिऊन घेतला हे मक्षिके हे जग असेच आहे.
उत्तर द्याहटवाअश्या मक्षिकेसाठी त्यांनी मक्षिकेला उद्येश्युन हे काव्य केले आहे.
माझ्या माहितीप्रमाणे " दवबिंदु " ह्या कवितेचे विडंबन आहे असे वाटते.
जयव़तसुत.