बुधवार, १६ डिसेंबर, २००९

दवांत आलीस भल्या पहाटे - बा सी मर्ढेकर

दवांत आलीस भल्या पहाटी
शुक्राच्या तोऱ्यात एकदा,
जवळुनि गेलिस पेरित अपुल्या
तरल पावलांमधली शोभा

अडलिस आणिक पुढे जराशी
पुढे जराशी हसलिस; - मागे
वळुनि पाहणे विसरलीस का?
विसरलीस का हिरवे धागे?

लक्ष्य कुठे अन कुठे पिपासा,
सुंदरतेचा कसा इशारा;
डोळ्यांमधल्या डाळिंबांचा
सांग धरावा कैसा पारा!

अनोळख्याने ओळख कैशी
गतजन्मीची द्यावी सांग;
कोमल ओल्या आठवणींची
एथल्याच जर बुजली रांग!

तळहाताच्या नाजुक रेषा
कुणि वाचाव्या, कुणी पुसाव्या;
तांबुस निर्मल नखांवरी अन
शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या!

दवांत आलिस भल्या पहाटी
अभ्राच्या शोभेत एकदा;
जवळुनि गेलिस पेरित अपुल्या
मंद पावलांमधल्या गंधा.

७ टिप्पण्या:

  1. मर्ढेकरांचे शब्द आणि कविता अगदिच इअतरांपेक्षा वेगळी असते.. बऱ्याच ठिकानी वाचताना थांबून त्यावर विचार करून अर्थ शोधावा लागतो... मजा येते शब्दाचे आकलन झाल्यावर.... बा‌‌. सी. च्या कविता आधुनिक नव्हे तर इतरांच्या पेक्शा कितीतरी पुढच्या होत्या...

    आपन मात्र उल्लेखनिय उपक्रम चालू केला आहेत.. आम्ही येत राहनार ईकडे वारंवार.

    .

    आपला..

    साळसुद पाचोळा.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. तुम्ही वाचक आहात वाटतं ! मग माझ्या एका कवी ते ला तुमची साथ मिळेल का ?

      हटवा