सोमवार, १४ नोव्हेंबर, २०११

सरिंवर सरी आल्या ग - बा. भ. बोरकर

सरिंवर सरी आल्या ग
सचैल गोपी न्हाल्या ग
गोपी झाल्या भिजून-चिंब
थरथर कापती निंब-कदंब
घनांमनांतुन टाळ-मृदंग
तनूंत वाजवी चाळ अनंग
पाने पिटिती टाळ्या ग
सरिंवर सरी आल्या ग

मल्हाराची जळांत धून
वीज नाचते अधुनमधून
वनांत गेला मोर भिजून
गोपी खिळल्या पदी थिजून
घुमतो पावा सांग कुठून?
कृष्ण कसा न उमटे अजून?
वेळी ऋतुमति झाल्या ग
सरिंवर सरी आल्या ग

हंबर अंबर वारा ग
गोपी दुधाच्या धारा ग
दुधात गोकुळ जाय बुडून
अजून आहे कृष्ण दडून
मी-तू-पण सारे विसरून
आपणही जाऊ मिसळून
सरिंवर सरी आल्या ग
दुधात न्हाणुनि धाल्या ग
सरिंवर सरी : सरिंवर सरी....

२ टिप्पण्या:

  1. हे काम भन्नाट आहे. खूपच आवडलं. तुम्हाला चालणार असेल तर यात काही कवितांची भर घालायला मला आवडेल.

    उत्तर द्याहटवा
  2. उपक्रमात सहभागी होण्याची तयारी दाखविल्याबद्दल धन्यवाद शीतल! जितकं जास्त तितकं चांगलंच आहे.
    पद्माकर.खांडेकर ऍट जीमेल वर संपर्क साधल्यास आपण ह्यावर सविस्तर बोलू शकू.

    उत्तर द्याहटवा