मंगळवार, १३ मार्च, २००७

अन्योक्ती - कृष्णशास्त्री चिपळूणकर

सूर्यान्योक्ति

(शार्दूलविक्रीडित)

देखूनी उदया तुझ्या द्विजकुळे गाती अती हर्षुनी,
शार्दूलादिक सर्व दुष्ट दडती गिर्यंतरीं जाउनी,
देशी ताप परी जसा वरिवरी येशी नभीं, भास्करा,
अत्त्युच्चीं पदिं थोरही बिधडतो हा बोल आहे खरा.

-----------------------------------------------------------------

गजान्योक्ति

(स्त्रग्धरा)

ज्याची स्पर्धा कराया इतर गज कधीं शक्त नाहीच झाले
सांगावे काय? ज्याच्या मृगपतिहि भयें रान सोडून गेले,
तो पंकामाजिं आजी गजवर फसला, युक्ति नाहीं निघाया.
अव्हेरिती, पहा, हे कलकल करुनी क्षुद्र कोल्हे तयाला.

-----------------------------------------------------------------

हरिणान्योक्ति

(शार्दूलविक्रीडित)

जाळे तोडुनियां बळें हरिण तो टाळोनि दावाग्निला,
व्याधाचे चुकवूनि बाणहि महावेगें पुढें चालिला,
तों घाईंत उडी फसूनि पडला आडामधें बापडा;
होती सर्वहि यत्न निष्फळ, जरी होई विधी वांकडा.

-----------------------------------------------------------------

आंब्याविषयी

(शार्दूलविक्रीडित)

ज्याचे पल्लव मंगलप्रद, शिणा छाया जयाची हरी
गंधें युक्ते फुलें, फळेंही असती ज्याचीं सुधेच्या परी,
वाटे जो रमणीय भूषण वनश्रीचे मुखींचें, भला
आम्रा त्या पिक सेवितां समसमां संयोग कीं जाहला!

-----------------------------------------------------------------

बगळ्याविषयी

(शिखरिणी)

उभा राहे एके चरणिं धरणीतें धरुनियां
तपश्चर्या वाटे करित जणुं डोळे मिटुनियां,
बका ऐशा ढोंगे तव अमति मासेच ठकती,
परि ज्ञाते तूझें कपट लवलाहीं उमजती.

-----------------------------------------------------------------

चंदनाविषयी

(पृथ्वी)

वनीं विलसती बहू विविध वृक्ष चोंहींकडे,
तयांत मज चंदनासम न एकही सांपडे,
जयास न दिली फळें न कुसुमेंहि दैवें जरी,
शरीर झिजवूनि जो तरि परोपकारा करी.

-----------------------------------------------------------------

कोकिलान्योक्ती

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का मधुर भाषणे तू करिशी अनेक
हे मूर्ख, यांस नसे किमपी विवेक
रंगावरुन तुजला गमतील काक

३१ टिप्पण्या:

  1. छान संग्रह केला आहे तुम्ही. एक दुरुस्ती सुचवावीशी वाटते.
    कोकिलान्योक्ती : दुसरी ओळ खालीलप्रमाणे आहे.

    "का भाषणे मधुर तू करिशी अनेक"

    धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा



  2. "येथे समस्त बहिरे बसतात लोक" ही कोकिलान्योक्ती वसन्ततिलका या छन्दात आहे. या अन्योक्तिचे मूळ सुभाषितही याच छन्दात आहे. त्याची पहिली ओळ 'अस्यां सखे बधिर-लोक-विलास-भूमौ' अशी आहे. ते पूर्ण सुभाषित जालावर उपलब्ध आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. या व यासारख्या कलाकृती अनुभवणे हा मानवी जीवनातील अत्युच्च आनंद आहे.हे आधुनिक काळात हे साहित्य सहज उपलब्ध होत नाही.आंतरजाल हे यावरील उतारा आहे.आपला हा संग्रह आनंददायक आहे।

    उत्तर द्याहटवा
  4. या व यासारख्या कलाकृती अनुभवणे हा मानवी जीवनातील अत्युच्च आनंद आहे.हे आधुनिक काळात हे साहित्य सहज उपलब्ध होत नाही.आंतरजाल हे यावरील उतारा आहे.आपला हा संग्रह आनंददायक आहे।

    उत्तर द्याहटवा
  5. अत्यंत उपयोगी आणि उपकारी ब्लॉग. मी 'सूर्यान्योक्ति'च्या शोधात होतो, सहजच. 'देखूनी उदया तुझ्या'या ऐवजी मी 'दावाग्नि खवळोनिया द्विजकुळे' घोकत होतो पण पूर्वार्धाचा अर्थच लागेना. म्हणून 'इथे' पोहोचलो. शब्दात सांगता येणार नाही एवढे मनःपूर्वक आभार. ब्लॉग ची लिंक सेव्हली आहे.
    पुनश्च धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. देखोनि उदया तुझ्या द्विजकुळे गातीअतीहर्षुनी शार्दूलादिक क्ष्वापदेही दिली गिर्यांतरि जाउनी देशी ताप जसा परीवरीवरी येशील नभी भाष्करा अत्युचीपदी थोरही बिघडतो हा बोलत आहेखरा

      हटवा
  6. फारच छान।।।सिंह अन्योक्ती आठवते का।।।मला दोन ओळी आठवतात।।मेघांच्या गर्जनेने खवळून वरती सिंह पाही स्वभावे

    उत्तर द्याहटवा
  7. मेघांच्या गर्जनेने खवळूनी वरती सिंह पाहे स्वभावे
    काका त्वा भीति त्यजुनि तरुवरी मांसखंडास खावे
    जो उन्मत्ता गजांच्या खरतर नखरी फोडुनी मस्तकाते
    धाला रक्त पिउनी नच मृतपशूच्या इच्छितो तो कणाते

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. मेघांच्या गर्जनेचा आवाज ऐकून झाडाखाली उभा असलेला सिंह वरती बघतो.त्याच झाडावर कुणीतरी मारुन टाकलेल्या पशुच्या मासाचा तुकडा कावळा भक्षण करत असतो.
      इतक्यात विजेचा कडकडाट होतो. सिंह सिंहासारखाच आवाज कोण काढतोय म्हणून रागाने वरती बघतो.पण कावळ्याला वाटतं की खाली उभ्या असलेल्या सिंहाला माझ्या मुखातील मांस हवे आहे.
      कवी कृष्णशास्त्री पंडित म्हणतात,अरे कावळ्या खाली उभा असलेला सिंह 🦁 हा उन्मत्त झालेल्या 🐘 हत्तीचे मस्तक फोडून रक्त पितो .असा शुर तुझ्या सारख्या जवळचं मेलेल्या, दुसऱ्या कडून आणलेल्या तासांची अपेक्षा काय करेल?🤟🤟🤟🤟🤟🤟🤟🤟🤟🤟🤟🤟

      हटवा
    2. एक गजान्योक्ती थोडीबहुत आठवते
      माझी शक्ति अपूर्व बाग अवघा। म्या मोडुनी टाकिला
      ऐसे मानुनिहर्ष फार तुजला चित्ती खरा वाटला।ग्रिष्माने तपुनी ...।करितसे अंगी तुझ्या काहिली.
      ती पुडा टळण्यास कोणति तुवा युक्ती गजा योजिली।
      यातील तिसरी ओळ अर्धवट आठवली आहे

      हटवा
  8. कृतीची आयाळे जडवूनी गळा पुष्ट करुनी
    बसे श्वा सिहाच्या पदी बहुत आवेश धरुनी
    तिसरी ओळ आठवत नाही . चौथी ' कसा त्या नडते क्षणभरीही तो पामर करी
    कोणाला आठवत असेल तर सांगा .

    उत्तर द्याहटवा
  9. मेघांच्या गर्जनेने खवळूनी वरती सिंह पाहे स्वभावे....

    yacha mul sanskrut shlok kunala sangata yeil ka plz?
    Dhanywad

    उत्तर द्याहटवा
  10. या माळावर वृक्ष एकही नसे बाळा खुळ्या कोकिळा, जेथे आम्र फुलोनी गंध विखरे तो देश बा वेगळा... याच्या पुढील ओळी सांगू शकाल का ?

    उत्तर द्याहटवा
  11. शूकान्योक्ती आठवत नाहीये सांगू शकाल का?

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे

    1. फळे मधुर खावया असति नित्य मेवे तसे,
      हिरेजडित सुंदरी कनकपंजरीही वसे,
      अहर्निश तथापि तो शुक मनात दुःखे झुरे,
      स्वतंत्र वनवृत्तिच्या घडिघडी सुखाते स्मरे.

      हटवा
  12. चंदन अन्योक्ती मधील ओळी .....ब्रे फले फुलेही न येतो तुला चंदना त्यांच्या बा संरक्षण कृती केव्हढी ही योजना
    शार्दुल विक्रिदित मधील ही कविता आहे .सुरुवातीच्या ओळी आठवत नाही.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. आहे एक सुगंध मात्र जवळी तो त्यास राखावया
      ऐसे घोर भुजंग पाळसी जना जे धावती खावया
      येती गोड फळे फुलेही बरवी दैवी तुला चंदना
      त्यांच्या बा करितोसी काय न कळे सरंक्षणा योजना

      हटवा
  13. कोजागरती असा पुनश्च पडला कर्णी तयाचे ध्वनी
    आहे पृच्छक कोण हा - ही अन्योक्ति पूर्ण सांगु शकाल कां?

    उत्तर द्याहटवा
  14. कोजागरती असा पुनश्च पडला कर्णी तयाचे ध्वनी आहे पृच्छक कोण हा- ही अन्योक्ति पूर्ण सांगु शकाल कां?

    उत्तर द्याहटवा
  15. कोजागरती असा पुनश्च पडला कर्णी तयाचे ध्वनी आहे पृच्छक कोण हा- ही अन्योक्ति पूर्ण सांगु शकाल कां?

    उत्तर द्याहटवा
  16. मेघांच्या गर्जनेने खवळून वरती सिंह पाही स्वभावे
    काका त्वा भिती सारी त्यजुनि तरूवरी मांस खंडास खावे.
    जो उन्मत्त गजांच्या खरतर नश्वरी फोडोनि मस्तकाते.
    घाला रक्ता पिऊनि, नच इच्छित मृत पशुच्या मांस खंडास खावे.
    अर्थ.
    मेघांच्या गर्जनेने खवळून त्यांच्या गर्जनेसारखा आवाज ऐकून झाडाखाली उभा असलेला सिंह 🦁 संतापतो. त्याच झाडावर कुठूनतरी मिळवलेले दुसऱ्या मृत पशूंचे मांस भक्षण करणारा कावळा असतो.कावळ्याला वाटतं की सिंहाला माझ्या मुखातील मांस हवे आहे.
    कशी कृष्णशास्त्री पंडित म्हणतात ,
    अरे कावळ्या,खाली उभा असलेला सिंह 🦁 हा उन्मत्त झालेल्या 🐘 हत्तीचे मस्तक फोडून रक्त पितो असा सिंह 🦁 तुझ्यासारख्या जवळचे दुसऱ्या कडून आणलेल्या,मृत पशूंचे कुजक्या मांसाची अपेक्षा काय ठेवेल!!!!
    अर्चना कुळकर्णी हडपसर पुणे.

    उत्तर द्याहटवा
  17. अग्नीला जल छत्र वारणे तसे। सुर्या तपासि असे।
    दण्डे गोखर वारिती मद्युक्ता।हस्तीसि तीक्ष्णांकुरो।
    व्याधी औषध संग्रहेही ।विविधा मंत्र प्रयोगी असे।
    शास्त्री या सकलास।औषध परी ।मुर्खास कोठे नसे।

    उत्तर द्याहटवा
  18. गजान्योक्ती कर्णै लोंबती चामरे चमकती माळा गळ्यासाजिरा वेली रंगविल्या फुले परीवरीवरी सोंडे वरी साजीरा ऐसा तो नटला तरीनृपकरी पाई बिडी वागवी कैसी त्यास मुळे स्वतंत्र वणिच्या हत्ती पुढे थोरवी

    उत्तर द्याहटवा
  19. आम्ही शिकलो ती गजान्योक्ती
    माझी शक्ति अपूर्व बाग अवघा म्या मोडुनी टाकिला।
    पूर्णतः कोणी देईल का ?

    उत्तर द्याहटवा