सोमवार, २३ एप्रिल, २००७

माझ्या मना बन दगड - विंदा करंदीकर

माझ्या मना बन दगड

हा रस्ता अटळ आहे !
अन्नाशिवाय, कपड्याशिवाय
ज्ञानाशिवाय, मानाशिवाय
कुडकुडणारे हे जीव
पाहू नको, डोळे शिव!
नको पाहू जिणे भकास,
ऐन रात्री होतील भास
छातीमधे अडेल श्वास,
विसर यांना दाब कढ
माझ्या मना बन दगड!

हा रस्ता अटळ आहे !
ऐकू नको हा आक्रोश
तुझ्या गळ्याला पडेल शोष
कानांवरती हात धर
त्यांतूनही येतील स्वर
म्हणून म्हणतो ओत शिसे
संभाळ, संभाळ, लागेल पिसे!
रडणाऱ्या रडशील किती?
झुरणाऱ्या झुरशील किती?
पिचणाऱ्या पिचशील किती?
ऐकू नको असला टाहो
माझ्या मना दगड हो!

हा रस्ता अटळ आहे !
येथेच असतात निशाचर
जागोजाग रस्त्यावर
असतात नाचत काळोखात;
हसतात विचकून काळे दात
आणि म्हणतात, कर हिंमत
आत्मा विक उचल किंमत!
माणूस मिथ्या, सोने सत्य
स्मरा त्याला स्मरा नित्य!
भिशील ऐकून असले वेद
बन दगड नको खेद!

बन दगड आजपासून
काय अडेल तुझ्यावाचून
गालावरचे खारे पाणी
पिऊन काय जगेल कोणी?
काय तुझे हे निःश्वास
मरणाऱ्याला देतील श्वास?
आणिक दुःख छातीफोडे
देईल त्यांना सुख थोडे?
आहे तेवढे दुःखच फार
माझ्या मना कर विचार
कर विचार हास रगड
माझ्या मना बन दगड

हा रस्ता अटळ आहे !
अटळ आहे घाण सारी
अटळ आहे ही शिसारी
एक वेळ अशी येईल
घाणीचेच खत होईल
अन्यायाची सारी शिते
उठतील पुन्हा, होतील भुते
या सोन्याचे बनतील सूळ
सुळी जाईल सारे कूळ
ऐका टापा! ऐका आवाज!
लाल धूळ उडते आज
त्याच्यामागून येईल स्वार
या दगडावर लावील धार!
इतके यश तुला रगड
माझ्या मना बन दगड

१३ टिप्पण्या:

  1. khup chhan kavita !!!
    post kelyabaddal dhanyavaad.

    Kavyasnrahaach naav kalalyas adhik anand hoil :)

    उत्तर द्याहटवा
  2. खूप दिवसापासून या कवितेच्या शोधात होतो.
    वाचायला मिळाली. धन्यवाद👏

    उत्तर द्याहटवा
  3. aamachya velachya aksraavichya marathi pustakat hi kavita hoti. saras aani prsbhavashali.

    उत्तर द्याहटवा
  4. कौतुकाचे शब्द कमी पडतील विंदा साठी .....

    उत्तर द्याहटवा
  5. आत्ता च्या काळात प्रशासकीय चुका ऐकून अशीच अवस्था होते.

    उत्तर द्याहटवा