शुक्रवार, २५ फेब्रुवारी, २०११

रॉय किणीकर

या पाणवठ्यावर आले किति घट गेले
किति डुबडुबले अन बुडले वाहुनि गेले
किति पडुनि राहिले तसेच घाटावरती
किति येतिल अजुनि नाही त्यांना गणती

मी शब्द परंतू मूर्तिमंत तू मौन
मी पंख परंतू क्षितिजशून्य तू गगन
काजळरेघेवर लिहिले गेले काही
(अन) मौनाची फुटली अधरावरती लाही

शहाण्या शब्दांनो हात जोडतो आता
कोषात जाउनी झोपा मारीत बाता
रस रुप गंध अन स्पर्श पाहुणे आले
घर माझे नाही, त्यांचे आता झाले

वाकला देह वाकली इंद्रिये दाही
चिरतरुण राहिली देहातील वैदेही
मन नाचविते अन नेसविते तिज लुगडी
मन नपुंसक खेळे शृंगाराची फुगडी

हा देह तुझा पण देहातिल तू कोण
हा देह तुझा पण देहाविण तू कोण
हा देह जन्मतो वाढत जातो सरतो
ना जन्म मरण ना देहातील तो म्हणतो

पाहिले, परंतु ओळख पटली नाही
ऐकले, परंतु अर्थ न कळला काही
चाललो कुठे पायांना माहीत नव्हते
झोपलो, परंतु स्वप्न न माझे होते

कोरून शिळेवर जन्म-मृत्युची वार्ता
जा ठेव पणती त्या जागेवर आता
वाचिल  कुणीतरी होताना उत्खनन
म्हणतील, कोण हा, कशास त्याचे स्मरण?’

ही युगायुगांची आहे अक्षर यात्रा
एकदाच भरते स्माशानाताली जत्रा
खांद्यावर घेउनि शव फिरतो जन्म
राखेत अश्रुला फुटला हिरवा कोंब

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा