मंगळवार, १ फेब्रुवारी, २०११

मैत्रिण - शांता शेळके

स्वप्नातल्या माझ्या सखी
कोणते तुझे गाव?
कसे तुझे रंगरुप
काय तुझे नाव?

कशी तुझी रितभात?
कोणती तुझी वाणी?
कसे तुझ्या देशामधले
जमीन, आभाळ, पाणी?

लव्ह्याळ्याच्या मुळांतून
झिरपताना पाणी
त्यात पावले बुडवून तू ही
गुणगुणतेस का गाणी?

सुगंधित झुळका चार
केसांमध्ये खोवून
तू ही बसतेस ऊन कोवळे
अंगावर घेऊन?

काजळकाळ्या ढगांवर
अचल लावून दृष्टी
तू ही कधी आतल्याआत
खूप होतेस कष्टी?

कुठेतरी खचित खचित
आहे सारे खास,
कुठेतरी आहेस तू ही
नाही नुसता भास.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा