गुरुवार, ४ ऑगस्ट, २०११

सनेही - एक कवितावली - वासंती मुझुमदार

पावसानं आपणहून यावं
असं खरं तर काय केलंय आपण?
काही करु शकतो का तरी?
आपण आपले त्याच्या येण्याचे साक्षी...
याहून काहीच नाही हाती.

पण एखाददिवशी
अगदी एकटक पाहत राहिल्यावर
आपोआप
उघडतं क्षितिज
आणि भोवतालच्या वृक्षांच्या
फांद्या
जळधारांच्याच असतात कितीकदा...

...

अगणित पाऊसकाळांतून
न्हाऊन आलेय
आजवर.

आत्ता कुठं कळतंय :
आपल्या हातात काहीच नसतं.
बरसण्याचं...

...

प्रत्येक पावसाळ्यात
तुझे
वेगवेगळे ’परफ्यूम्स’.

मला आपलं वाटायचं :
सतत तोच सुगंध येईल
तुझ्या हातांना
तुला मी चाफे दिले ना,
तेव्हाचा.

...

बोलावलंस
म्हणून आले.

तुझ्या
फुलांनी बहरलेल्या शहरा
लाल केशरी गेंदांची
सगळ्याभर फाल्गुनी.
ना डोळे निवायला उसंत...

इतक्या दिवसांनंतर
इथं आलास
तेव्हा माझ्या नगरात
नुसताच शिरवाच शिरवा...

माझे डोळे निवलेले.
तुझे मात्र विझलेले.

...

सगळं ओझं
उतरवून ठेवता येतं
तुझ्या दाराआत
सुरक्षित;
आणि
पूर्ण पाऊसकाळ होता येतं
मनभर...

तुझ्या स्निग्धतेनं
भरुन येतं मन
पुन्हा पुन्हा;
आणि
उतरवून ठेवलं जे जे
त्याला ना,
जागा उरेनाशी होते.
पावसानं
माती खोलपर्यंत ओली झाल्यावर
सुगंधाचं झाड फुटतं बघ
तीतून.
तसा तू परिमळत राहतोस
माझ्या असण्याभोवतालून...

...

"...माझं म्हणावं
असं तुझं
काय आहे माझ्यात?"
असं कोडं
नाही घालायचं पुन्हा.
किती वेळा उत्तर सांगू?
पाऊस...
पाऊस...
पाऊस...

४ टिप्पण्या: