सोमवार, १० सप्टेंबर, २०१२

ये ये ताई पहा पहा

(काही सुधारणा असल्यास कृपया सुचवावी)

ये ये ताई पहा पहा, गम्मत नामी किती अहा
चांदोबा खाली आला, हौदामध्ये बघ बुडला
कसा उतरला, किंवा पडला, पाय घसरला 


कशास उलटे चालावे, पाय नभाला लावावे.
किती उंच ते आभाळ, तेथुनी हौद किती खोल

तरी हा ताई, "आई आई", बोलत नाही
चांदोबा तू रडू नको, ताई तू मज हसू नको

किती किती हे रडलास, हौद रड्याने भरलास
तोन्ड मळविले, अंग ठेचले, तेज पळाले 

उलटा चालू नको कधी, असाच पडशील जलामधी!

सोमवार, २ जानेवारी, २०१२

मनातल्या मनात मी - सुरेश भट

मनातल्या मनात मी

मनातल्या मनात मी तुझ्यासमीप राहतो !
तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो !

अशीच रोज नाहुनी
लपेट उन्ह कोवळे,
असेच चिंब केस तू
उन्हात सोड मोकळे;
तुझा सुगंध मात्र मी इथे हळूच हुंगतो !

अशीच रोज अंगणी
लवून वेच तू फुले,
असेच सांग लाजुनी
कळ्यांस गूज आपुले;
तुझ्या कळ्या, तुझी फुले इथे टिपून काढतो !

अजून तू अजाण ह्या
कुंवार कर्दळीपरी,
गडे विचार जाणत्या
जुईस एकदा तरी;
'दुरून कोण हा तुझा मकरंद रोज चाखतो...?'

तसा न राहिला अता
उदास एकटेपणा,
तुझीच रूपपल्लवी
जिथे तिथे करी खुणा;
पहा कसा हवेत मी तुझ्यासवे सळाळतो ! 






(Courtesy - Sheetal Bhangre)