गुरुवार, १९ नोव्हेंबर, २००९

माझे जगणे होते गाणे - कुसुमाग्रज,

माझे जगणे होते गाणे

सुरेल केंव्हा, केंव्हा बेसुर
तालावाचून वा तालावर
कधी तानांची उनाड दंगल
झाले सुर दिवाणे

कधी मनाचे कधी जनाचे
कधी धनास्तव कधी बनाचे
कधी घनाशय कधी निराशय
केवळ नादतराणे

आलापींची संथ सुरावळ
वा रागांचा संकर गोंधळ
कधी आर्तता काळजातली
केंव्हा फक्त बहाणे

राईमधले राजस कूजन
कधी स्मशानामधले क्रन्दन
अजाणतेचे अरण्य केंव्हा
केंव्हा शब्द शहाणे

जमले अथवा जमले नाही
खेद खंत ना उरली काही
अदॄश्यातिल आदेशांचे
ओझे फक्त वाहणे

सुत्रावाचून सरली मैफल
दिवेही विझले सभागॄहातिल
कशास होती आणि कुणास्तव
तो जगदीश्वर जाणे

शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २००९

साधना - धामणस्कर

तृषार्ततेच्या काठावरील पाखराला
आपल्या असण्यामुळे पाणी पिण्यास संकोच वाटला तर,
आपला म्हटले त्यानेच परका मानल्यावर
आपण करतो तेच करायचे; त्याच्या वाटेतून
त्याच्या सोयीसाठी दूर व्हायचे....तरीही पक्षी
कुठल्या पाइपलाईनमधून थेंब थेंब ठिबकून जमलेल्या
निवळशंख पाण्याला शिवत नसेल तर
पाण्यात आपण आहोत असे जाणून
आणखी दूर जायचे. पक्ष्याला
पाण्यात फक्त आकाश दिसेपर्यंत
कसलाच भरवसा वाटणार नाही...

कुणाला संकोच वाटत असेल तेव्हा
कणवपूर्ण हृदयाने स्वतःला दूर करणे ही
साधनेची सुरुवात; सांगतेचा क्षण आला की
तुम्हीच आकाश झालेले असता. मग
जलाशयाच्या अगदी काठावर उभे राहीलात तरी
पाण्यात फक्त आकाशच असेल. एखाद्या
हुशार पक्ष्यालाही तुम्हांला
आकाशापासून
वेगळे करता येणार नाही...