सोमवार, १५ सप्टेंबर, २००८

निरोप - कुसुमाग्रज

( पुढील कविता ही माझा मित्र आणि ह्या संग्रहाचा सह-संकलक - किरण रानडे - ह्याच्या आईच्या स्मरणानुसार उद्धृत करीत आहे. जाणकारांकडून सुधारणांची अपेक्षा आहे. माझे श्वसुर - श्री. शशिकांत दात्ये - ह्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ह्या कवितेची पार्श्वभूमी ही फाळणीच्या काळात पूर्व पाकिस्तानात घडलेल्या एका प्रसंगाची आहे. पूर्व पाकिस्तानातून फाळणीनंतर भारतात यायला निघालेल्या एका विमानात एक माता आपल्या कोवळ्या मुलाला सोडून देते, असा काहिसा तो प्रसंग होता. ह्याही संदर्भात कुणा जाणकार रसिकांस काही माहिती असेल तर ती अवश्य द्यावी.)

गर्दीत बाणासम ती घुसोनि
चाले, ऊरेना लव देहभान
दोन्ही करांनी कवटाळूनीया
वक्ष:स्थळी बालक ते लहान

लज्जा न, संकोच नसे, न भीती
हो दहन ते स्त्रीपण संगरात
आता ऊरे जीवनसूत्र एक
गुंतोनी राहे मन मात्र त्यात

बाजार येथे जमला बळींचा
तेथेही जागा धनिकांस आधी
आधार अश्रूसही दौलतीचा
दारिद्र्य दु:खा दुसरी उपाधी

चिंध्या शरीरावरी सावरोनी
राहे जमावात जरा उभी ती
कोणी पहावे अथवा पुसावे?
एकाच शापातून सर्व जाती

निर्धार केला कसला मानसी
झेपाउनी ये ठिणगीप्रमाणे
फेकूनिया बाळ दिले विमाने
व्हावे पुढे काय प्रभूच जाणे

"जा बाळा जा, वणव्यातुनी या
पृथ्वीच आई पुढती तुझी रे
आकाश घेईं तुजला कवेंत
दाही दिशांचा तुज आसरा रे"

ठावे न कोठे मग काय झाले
गेले जळोनीं मन मानवाचे
मांगल्य सारे पडले धुळीत
चोहीकडे नर्तन हिंस्त्रतेचे!

शनिवार, २३ ऑगस्ट, २००८

हस्तांतर - धामणस्कर

विसर्जनासाठी गणपती नेताना
मला मूर्ती जड झाली, तेव्हा
उसळत्या तारुण्याचा
माझा मुलगाच मला म्हणाला: द्या इकडे.

मी मूर्ती तात्काळ मुलाच्या हातावर ठेवली
चौरंगासहित.
मुलानेही मूर्ती हातात घेतली नीट सावरून, तर
मी एका दैवी आनंदात अकल्पित
परंपरा पुढे सरकल्याच्या....

मी पुन्हा तरूण ययातीसारखा;
माझा मुलगा जख्ख म्हातारा,
परंपरेच्या ओझ्याने वाकलेला....

गुरुवार, १० जुलै, २००८

कढ - इंदिरा संत

कुणी निंदावे त्यालाही
करावा मी नमस्कार
कुणी धरावा दुरावा
त्याचा करावा सत्कार

काही वागावे कुणीही
मीच वागावे जपून
सांभाळण्यासाठी मने
माझे गिळावे मीपण

कित्येकांना दिला आहे
माझ्या ताटातील घास,
कितिकांच्या डोळ्यातील
पाणी माझ्या पदरास!

आज माझ्या आसवांना
एक साक्षी ते आभाळ
मनातील कढासाठी
एक अंधार प्रेमळ

इंदिरा संत

शुक्रवार, ४ जुलै, २००८

अस्थाई - बा.सी.मर्ढेकर

अस्थाईवर स्थायिक झालों,
चुकून गेला पहा अंतरा;
ओरडून का अता लागणें
ढिल्या गळ्यावर पंचम गहिरा!

नशेंत झुकला निशापती अन्
अस्मानाच्या कलल्या तारा;
अंधारावर विझून गेला
रात्रीचा या वीज-पिसारा

क्लिन्न मनोगत मोटारींचें
कुशींत शिरलें काळोखाच्या;
नालबंद अन् घोड्याची ये
टाप समेवर जिवंततेच्या.

शांत जगाच्या घामावरला
उडून काळा गेला वास;
बेटाबेटांतुनी मनांच्या
जराच हलला श्वासोच्छ्वास.

अस्थाईवर पुन्हा परतलों,
चुकून गेला पहा अंतरा;
ढिल्या गळ्यावर षड्ज बांधणें
अता खालचा परंतु हसरा.

बा.सी.मर्ढेकर

गुरुवार, ३ जुलै, २००८

पिपांत मेले ओल्या उंदिर - बा.सी.मर्ढेकर

पिपांत मेले ओल्या उंदिर;
माना पडल्या, मुरगळल्याविण;
ओठांवरती ओठ मिळाले;
माना पडल्या, आसक्तीविण.
गरिब बिचारे बिळांत जगले,
पिपांत मेले उचकी देउन;
दिवस सांडला घाऱ्या डोळीं
गात्रलिंग अन धुऊन घेउन.

जगायची पण सक्ती आहे;
मरायची पण सक्ती आहे.

उदासतेला जहरी डोळे,
काचेचे पण;
मधाळ पोळें
ओठांवरती जमलें तेंही
बेकलाइटी, बेकलाइटी!
ओठांवरती ओठ लागले;
पिपांत उंदिर न्हाले! न्हाले!

बुधवार, २ जुलै, २००८

पावसा - अनिल

पावसा पावसा किती येशील?
आधीच ओलेत्या रातराणीला
किती भिजवशील?

पावसा पावसा थांब ना थोडा
पिळून काढुन न्हालेले केस
बांधु दे एकदा सैल अंबाडा

पावसा पावसा लप ढगात
सागफ़ुलांची कशिदा खडीची
घालु दे तंगशी चोळी अंगात

पावसा पावसा ऊन पडु दे
वाळाया घातला हिरवा शालू
चापूनचोपून तिला नेसू दे

पावसा पावसा पाहा ना जरा
जांभळ्या फ़ुलांचा देवबाभळीने
वेणीत घालाया केला गजरा

पावसा पावसा आडोश्यातुन
साजरा शृंगार रानराणीचा
दुरून न्ह्याहाळ डोळे भरून...

मंगळवार, १ जुलै, २००८

दु:ख ना आनंदही - आरती प्रभू

दु:ख ना आनंदही अन अंत ना आरंभही,
नाव आहे चाललेली कालही अन आजही.
मी तसा प्रत्यक्ष नाही, ना विदेशी मी जसा,
मी नव्हे की बिंब माझें, मी न माझा आरसा.
एकला मी नाहि जैसा, नाहि नाहि मी दुणा,
मी नव्हें स्वामीहि माझा, मी न माझा पाहुणा.
प्रश्न की उद्गार नाही, अधिक नाही वा उणा,
जीवनाला ऐल नाही, पैल, तैसा मध्य ना.
याद नाही, साद नाही, ना सखी वा सोबती,
नाद आहे या घड्याला अन घड्याच्या भोवती.
सांध्यछाया आणि काया जोडुनी यांचा दुवा
नाव आहे चाललेली, दूरची हाले हवा.
दु:ख ना आनंदही अन अंत ना आरंभही,
नाव आहे चाललेली कालही अन आजही.