बुधवार, २४ मार्च, २०१०

तीर्थाटण - विंदा करंदीकर

तीर्थाटण मी करीत पोचलो
नकळत शेवट तव दारी;
अन तुझिया देहात गवसली
सखये मजला तीर्थे सारी

अधरावरती तव वृंदावन
प्रयाग सापडले नेत्री;
भालावरती ते मानसरोवर,
मानेवरती गंगोत्री

गया तुझ्या गालात मिळाली
रामेश्वर खांद्यावरती
मिळे द्वारका कमरेपाशी
अन काशी अवतीभवती

मोक्षाचीही नुरली इच्छा
नको कृपा याहून दुसरी
तीर्थाटण मी करीत पोचलो
नकळत शेवट तव दारी.

बुधवार, १७ मार्च, २०१०

विंदांना श्रद्धांजली - आणखी काही कणिका

२. प्रेम
सत्य युगाच्या अखेर झाली
प्रेम-द्वेष यांच्यात लढाई
द्वेषच होई विजयी आणि,
प्रेम लपे आईच्या हृदयी!

३. चंद्र आणि क्षय
चंद्र जाहला क्षयी कशाने?
शापबलाने, म्हणती कोणी;
कुजबुजला पण तो माझ्याशी;
या कवितांनी! या कवितांनी!

४. दर्पण
परमेशाला गमलें, आपण
रुप पहावें अपुले सुंदर;
आणिक केला त्यानें दर्पण;
तोच समजतो आपण सागर!

५. पदवी
जिवंत असता, महाकवे, तुज
मिळतील निव्वळ शिव्या घरोघर;
तूं मेल्यावर, त्या मोजुनियां
मिळविल कोणी पदवी त्यावर

६. नारदाचा वारस
नारद मेला; मी रडलो मग;
कोण कळी त्या लाविल नाहक!
शोक कशाला? वदला ईश्वर,
धाडुनि दिधला मी संपादक!

७. इतिहास
इतिहासाचे अवघड ओझे
डोक्यावर घेउनी ना नाचा
करा पदस्थल त्याचे आणिक
चढुनि त्यावर भविष्य वाचा

८. नायक
रामायण वाचुनिया नंतर
बोध कोणता घ्यावा आपण
श्रीरामासम मिळता नायक
वानर सुद्धा मारिती रावण

९. खळी
स्वर्गामधुनी येता बालक
अमृत त्याचे काढुन घेती
उरे रिकामी वाटी जवळी
ती खळी ही गालावरती

[संदर्भ: हितगुज]

मंगळवार, १६ मार्च, २०१०

विंदांना श्रद्धांजली - कणिका उत्क्रांती

[ज्ञानपीठ पारितोषिक विजेते मराठी कवी कै. विंदा करंदीकर  यांची एक कणिका  सादर करत आहे. कणिका  म्हणजे चार ओळींची छोटीशी कविता...]

उत्क्रांती
माकड हसले त्याच क्षणाला,
माकड मेले; माणूस झाला,
परदु:खाने रडला प्राणी
देव प्रकटला त्याच ठिकाणी 


[संदर्भ: दै. लोकमत]

शुक्रवार, २६ फेब्रुवारी, २०१०

एवढे लक्षात ठेवा - विंदा करंदीकर

उंची न आपुली वाढते, फारशी वाटून हेवा ।
श्रेय ज्याचे त्यास द्यावे; एवढे लक्षात ठेवा ॥

ती पूर्वजांची थोरवी, त्या पूर्वजांना गौरवी ।
ती न कामी आपुल्या, एवढे लक्षात ठेवा ।।

जाणते जे सांगती, ते ऐकून घ्यावे सदा ।
मात्र तीही माणसे; एवढे लक्षात ठेवा ॥

चिंता जगी या सर्वथा, कोणा न येई टाळता ।
उद्योग चिंता घालवी; एवढे लक्षात ठेवा ॥

विश्वास ठेवावाच लागे, व्यवहार चाले त्यावरी ।
सीमा तयाला पाहिजे; एवढे लक्षात ठेवा ॥

दुप्पटीने देतसे जो, ज्ञान आपण घेतलेले ।
तो गुरूचे पांग फेडी; एवढे लक्षात ठेवा ॥

माणसाला शोभणारे, युद्ध एकच या जगी ।
त्याने स्वतःला जिंकणे; एवढे लक्षात ठेवा ॥

[’निर्वाणीचे गझल’ पैकी एक गझल. संदर्भ लोकसत्ता]

सोमवार, ११ जानेवारी, २०१०

कविता - शांता शेळके

शेवटची ओळ लिहीली
आणि तो दूर झाला
आपल्या कवितेपासून
बराचसा थकलेला
पण सुटकेचे समाधानही अनुभवणारा
प्रसूतीनंतरच्या ओल्या बाळंतीणीसारखा
जरा प्रसन्न, जरा शांत
नाही खंत, नाही भ्रांत....

आणि ती कविता नवजात
एकाकी, असहाय, पोरकी
आधाराचे बोट सुटलेल्या
अजाण पोरासारखी
भांबावलेली, भयभीत,
अनुभवणारी एका उत्कट नात्याची
परिणती विपरीत

ती आहे आता पडलेली
कागदाच्या उजाड माळावर
आपल्या अस्तिवाचा अर्थ शोधत
तो मैलोगणती दूर, वेगळ्या विश्वात
संपूर्ण, संतुष्ट, आत्मरत!

रविवार, १० जानेवारी, २०१०

प्रेम करावे असे, परंतू.... - विंदा करंदीकर

हिरवे हिरवे माळ मोकळे;
ढवळ्या ढवळ्या त्यावर गाई;
प्रेम करावे अशा ठिकाणी
विसरुनि भीती विसरुनि घाई.

प्रेम करावे, रक्तामधले;
प्रेम करावे शुद्ध, पशूसम;
शतजन्मांच्या अवसानाने
रक्तामधली गाठावी सम.

प्रेम करावे मुके अनामिक;
प्रेम करावे होउनिया तृण;
प्रेम करावे असे, परंतू....
प्रेम करावे हे कळल्याविण.

ऊन हिवाळ्यांतिल शिरशिरता - विंदा करंदीकर

ऊन हिवाळ्यांतिल शिरशिरता
स्थितप्रज्ञ काळ्या दगडावर,
- मला वाटते क्षणभर फुटतो
दगडाला इच्छेचा अंकुर.

ऊन हिवाळ्यांतिल हळदीचे
किरिट घालते वृद्धा वडावर !
- मला वाटते तळ्यांत पाहुन
हात फिरवितो तो दाढीवर!

ऊन हिवाळ्यांतिल कुडकुडते,
कुशीत शिरते दिसतां डोंगर;
-मला वाटते त्यालाही मग
गरम झऱ्याचा फुटतो पाझर.

ऊन हिवाळ्यांतिल भुळभुळते
आजीच्या उघड्या पाठीवर;
- तिच्या भ्रमाला गमते आपण
पुन्हा जरीचा ल्यालो परकर.

ऊन हिवाळ्यांतिल हिरमुसते;
रुसते; अन माळावर बसते;
- मला वाटते त्यालाही पण
असेच भलते वाटत असते.