शुक्रवार, २६ फेब्रुवारी, २०१०

एवढे लक्षात ठेवा - विंदा करंदीकर

उंची न आपुली वाढते, फारशी वाटून हेवा ।
श्रेय ज्याचे त्यास द्यावे; एवढे लक्षात ठेवा ॥

ती पूर्वजांची थोरवी, त्या पूर्वजांना गौरवी ।
ती न कामी आपुल्या, एवढे लक्षात ठेवा ।।

जाणते जे सांगती, ते ऐकून घ्यावे सदा ।
मात्र तीही माणसे; एवढे लक्षात ठेवा ॥

चिंता जगी या सर्वथा, कोणा न येई टाळता ।
उद्योग चिंता घालवी; एवढे लक्षात ठेवा ॥

विश्वास ठेवावाच लागे, व्यवहार चाले त्यावरी ।
सीमा तयाला पाहिजे; एवढे लक्षात ठेवा ॥

दुप्पटीने देतसे जो, ज्ञान आपण घेतलेले ।
तो गुरूचे पांग फेडी; एवढे लक्षात ठेवा ॥

माणसाला शोभणारे, युद्ध एकच या जगी ।
त्याने स्वतःला जिंकणे; एवढे लक्षात ठेवा ॥

[’निर्वाणीचे गझल’ पैकी एक गझल. संदर्भ लोकसत्ता]

सोमवार, ११ जानेवारी, २०१०

कविता - शांता शेळके

शेवटची ओळ लिहीली
आणि तो दूर झाला
आपल्या कवितेपासून
बराचसा थकलेला
पण सुटकेचे समाधानही अनुभवणारा
प्रसूतीनंतरच्या ओल्या बाळंतीणीसारखा
जरा प्रसन्न, जरा शांत
नाही खंत, नाही भ्रांत....

आणि ती कविता नवजात
एकाकी, असहाय, पोरकी
आधाराचे बोट सुटलेल्या
अजाण पोरासारखी
भांबावलेली, भयभीत,
अनुभवणारी एका उत्कट नात्याची
परिणती विपरीत

ती आहे आता पडलेली
कागदाच्या उजाड माळावर
आपल्या अस्तिवाचा अर्थ शोधत
तो मैलोगणती दूर, वेगळ्या विश्वात
संपूर्ण, संतुष्ट, आत्मरत!

रविवार, १० जानेवारी, २०१०

प्रेम करावे असे, परंतू.... - विंदा करंदीकर

हिरवे हिरवे माळ मोकळे;
ढवळ्या ढवळ्या त्यावर गाई;
प्रेम करावे अशा ठिकाणी
विसरुनि भीती विसरुनि घाई.

प्रेम करावे, रक्तामधले;
प्रेम करावे शुद्ध, पशूसम;
शतजन्मांच्या अवसानाने
रक्तामधली गाठावी सम.

प्रेम करावे मुके अनामिक;
प्रेम करावे होउनिया तृण;
प्रेम करावे असे, परंतू....
प्रेम करावे हे कळल्याविण.

ऊन हिवाळ्यांतिल शिरशिरता - विंदा करंदीकर

ऊन हिवाळ्यांतिल शिरशिरता
स्थितप्रज्ञ काळ्या दगडावर,
- मला वाटते क्षणभर फुटतो
दगडाला इच्छेचा अंकुर.

ऊन हिवाळ्यांतिल हळदीचे
किरिट घालते वृद्धा वडावर !
- मला वाटते तळ्यांत पाहुन
हात फिरवितो तो दाढीवर!

ऊन हिवाळ्यांतिल कुडकुडते,
कुशीत शिरते दिसतां डोंगर;
-मला वाटते त्यालाही मग
गरम झऱ्याचा फुटतो पाझर.

ऊन हिवाळ्यांतिल भुळभुळते
आजीच्या उघड्या पाठीवर;
- तिच्या भ्रमाला गमते आपण
पुन्हा जरीचा ल्यालो परकर.

ऊन हिवाळ्यांतिल हिरमुसते;
रुसते; अन माळावर बसते;
- मला वाटते त्यालाही पण
असेच भलते वाटत असते.

मंगळवार, २९ डिसेंबर, २००९

पर्गती? - ग. दि. माडगुळकर

धानू शिरपती,
कुठं कशाची झाली रं पर्गती?
गाडी बी तीच
गडी बी तेच
बैल बी तेच
कासरा त्योच
सैल
मग बदललं ते काय?
बैलाचं पाय?
उजव्या अंगाचा भादा बैल,
डाव्या अंगाला आला
पर,
त्यानं बदल रं काय झाला?
आता बसणाराना वाटतंय
जत्रा माघारी निघाली
माझा म्हननं
ही मजलच अवघड हाय
हे वझं जीवापरीस जड हाय
गाडी बी नवी बांधाय हुवी
रस्ता बी नवा कराय होवा
ताजीतवानी खोंडं जुपली
'त' कुणाला ठावं
जाईल गाडी सरळ
पण हे कुणी करायचं?
कसं करायचं?
पयला गाडीवान म्हनायचा
जल्दी जल्दी
आताचा बी म्हनतोय
जल्दी जल्दी
वाट बदलत न्हाई
बैल हालत नाही
धानू शिरपती,
ही कसली गा क्रांती?

बाहुल्या घेता का बाहुल्या? - ग. दि. माडगुळकर

बाहुल्या घेता का बाहुल्या?
या लाकडाच्या नव्हेत,
कापडाच्या नव्हेत
या आहेत वैष्णवी मेणाच्या
संतापाने मंतरलेल्या
बाहुल्या घेता का बाहुल्या?

या जवळ ठेवा,
हवा बदलून जाईल,
भ्रष्टाकार नावाचा ब्रम्हराक्षस
आसपास फिरकणार नाही.
लाचाई,
जाचाई,
टंचाई,
महागाई,
या साऱ्या क्षुद्र देवता
दिसतील दूर पळालेल्या
बाहुल्या घेता का बाहुल्या?

यांना नुसते बघितले तरी
बगळ्या भगतांची
हागणी बंद होऊन जातील,
या दृष्टी पडल्या तर
हुकुमशहा कोलमडतील
त्यांचे हुजरेच त्यांची धिंड काढतील.
या बाहुल्या नव्या नाहीत
जुन्याच आहेत
या राजघाटावरच सापडल्या
बाहुल्या घेता का बाहुल्या?

या बाहुल्या
तरण्या पोरांच्या उशागती ठेवा
सूर्याने डोळा उघडावा
तसा जागा होईल तो
गुजरात, बिहार या प्रांतांत
या हजारांनी विकल्या गेल्या
बाहुल्या घेता का बाहुल्या?

शुक्रवार, १८ डिसेंबर, २००९

रे हिंदबांधवा - भा.रा.तांबे

रे हिंदबांधवा, थांब या स्थळी अश्रु दोन ढाळी,
ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झांशिवाली ll ध्रृ ll

तांबेकुलवीरश्री ती,
नेवाळकरांची कीर्ति,
हिंदभूध्वजा जणु जळती,
मर्दानी राणी लक्ष्मीबाई मूर्त महाकाली ll १ ll

घोडयावर खंद्या स्वार,
हातात नंगि तलवार,
खणखणा करित ती वार,
गोऱ्यांची कोंडी फोडित, पाडित वीर इथे आली ll २ ll

कडकडा कडाडे बिजली,
शत्रुंची लष्करे थिजली,
मग कीर्तिरूप ती उरली,
ती हिंदभूमीच्या पराक्रमाची इतिश्रीच झाली ll ३ ll

मिळतील इथे शाहीर,
लववितील माना वीर,
तरु, झरे ढाळीतील नीर,
ह्या दगडां फुटतील जिभा कथाया कथा सकळ काळी! ll ४ ll