बुधवार, १० जानेवारी, २००७

आजीचे घड्याळ - केशवकुमार

आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक,
देई ठेवुनि तें कुठे अजुनि हे नाही कुणा ठाउक;
त्याची टिक टिक चालते न कधिही, आहे मुके वाटते,
किल्ली देई न त्यास ती कधि, तरी ते सारखे चालते

"अभ्यासास उठीव आज मजला आजी पहाटे तरी,"
जेव्हा मी तिज सांगुनी निजतसे रात्री बिछान्यावरी
साडेपाचही वाजतात न कुठे तो हाक ये नेमकी
"बाळा झांजर जाहले, अरवला तो कोंबडा, उठ की !"

ताईची करण्यास जम्मत, तसे बाबूसवे भांडता
जाई संपुनियां सकाळ न मुळी पत्त कधी लागता !
"आली ओटिवरी उन्हे बघ!" म्हणे आजी, "दहा वाजले !
जा जा लौकर !" कानि तो घणघणा घंटाध्वनी आदळे.

खेळाच्या अगदी भरांत गढुनी जाता अम्ही अंगणी
हो केव्हा तिनिसांज ते न समजे ! आजी परी आंतुनी
बोले, "खेळ पुरे, घरांत परता ! झाली दिवेलागण,
ओळीने बसुनी म्हणा परवचा ओटीवरी येउन !"

आजीला बिलगून ऐकत बसू जेव्हा भुतांच्या कथा
जाई झोप उडून, रात्र किती हो ध्यानी न ये ऐकता !
"अर्धी रात्र कि रे" म्हणे उलटली, "गोष्टी पुरे ! जा पडा !'
लागे तो धिडधांग पर्वतिवरी वाजावया चौघडा

सांगे वेळ, तशाच वार-तिथीही आजी घड्याळातुनी
थंडी पाऊस ऊनही कळतसे सारें तिला त्यांतुनी
मौजेचे असले घड्याळ दडुनी कोठे तिने ठेविले?
गाठोडे फडताळ शोधुनि तिचे आलो ! तरी ना मिळे !

६ टिप्पण्या:

Ashay म्हणाले...

बाबांच्या तोंडून किती वेळा पहिली ओळ ऐकली पण पूर्ण कविता कुठेच मिळाली नाही. पोस्ट करण्याबद्दल खूप खपू धन्यवाद.

- आशय नाईक

Rajat Joshi म्हणाले...

शाळेत एकदा शिकलो होतो ही कविता. तेंव्हाही छान वाटली होती आणि आताही.

charuta malshe म्हणाले...

आज नातवाला गोष्ट सांगताना ही कविता मिळाली. छान वाटले.

charuta malshe म्हणाले...

आज नातवाला गोष्ट सांगताना ही कविता मिळाली. छान वाटले.

charuta malshe म्हणाले...

आज नातवाला गोष्ट सांगताना ही कविता मिळाली. छान वाटले.

Unknown म्हणाले...

शाळेत शिकलेली ही सर्वात आवडती कविता