मंगळवार, २९ एप्रिल, २००८

मरणांत खरोखर जग जगते - भा.रा.तांबे

मरणांत खरोखर जग जगते
अधिं मरण अमरपण ये मग ते ॥

अनंत मरणे अधीं मरावी
स्वातंत्र्याची आस धरावी
मारिल मरणचि मरणा भावी
मग चिरंजीवपण ये मग ते ॥ १ ॥

सर्वस्वाचे दान अधीं करी
सर्वस्वच ये तुझ्या घरी
सर्वस्वाचा यज्ञ करी तरि
रे! स्वयें सैल बंधन पडते ॥ २ ॥

स्वातंत्र्याचा एकचि ठावा
केवळ यज्ञचि मजला ठावा
यज्ञ मार्ग ! हो यज्ञ विसावा
का यज्ञाविण काही मिळते? ॥ ३ ॥

सीता सति यज्ञीं दे निज बळि
उजळुनि ये सोन्याची पुतळी
बळी देऊनी बळी हो बळी
यज्ञेच पुढे पाऊल पडते ॥ ४ ॥

यज्ञिं अहर्निश रवि धगधगतो
स्वसत्वदाने पाश छेदितो
ज्योतिर्गण नव जन्मुनि जगतो
रे स्वभाव हा! उलटे भलते ॥ ५ ॥

प्रकृति-गती ही मनिं उपजुनियां
उठा वीर कार्पंण्य त्यजुनिया;
'जय हर!'गर्जा मातेस्तव या!
बडबडुनी काही का मिळते? ॥ ६ ॥

५ टिप्पण्या:

Suvi म्हणाले...

if you have audio of अंगाई गीत : निज माझ्या छकुल्या चिमण्या राजा
कवी - भा. रा. तांबे can you please share it

Unknown म्हणाले...

Wa ृRomanch ubhe rahile

Narendra म्हणाले...

Share kelyabaddal dhanyawad!

Unknown म्हणाले...

ह्या कवितेत कविवर्य भा.रा.तांबे यांनी फार मोठा संदेश दिला आहे.मरण आहे म्हणून जग सुरू आहे.सगळ्यांना जर अमरत्व असते तर ह्या पृथ्वीवर काय परिस्थिती झाली असती,हा विचार केलेला बरा.एक मरण दुसऱ्या एकास जन्म देत असते.

S म्हणाले...

स्वातंत्र्य मिळविण्यासाठी मरणाची तमा बाळगू नये असा संदेश आहे.