शुक्रवार, ९ मे, २००८

गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या - बी

गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या
का गं गंगा यमुनाही ह्या मिळाल्या
उभय पितरांच्या चित्तचोरटीला
कोण माझ्या बोलले गोरटीला

विभा विमला आपटे प्रधानांच्या
अन्य कन्या श्रीमान कुलीनांच्या
गौरचैत्रीची कशास जुनी येती
रेशमाची पोलकी छीटे लेती

तुला लंकेच्या पार्वतीसमान
पाहुनीया होवोनी साभिमान
काय त्यातील बोलली एक कोण
"अहा, आली ही पहां भिकारीण"

पंकसंपर्के का कमळ भिकारी?
धुलीसंसर्गे रत्न का भिकारी?
सूत्रसंगे सुमहार का भिकारी?
कशी तुही मग मज मुळी भिकारी?लाट उसळोनी जळी खळे व्हावे
त्यात चंद्राचे चांदणे पडावे
तसे गाली हासता तुझ्या व्हावे
उचंबळूनी लावण्य बर वहावे

नारीमायेचे रुप हे प्रसिद्ध
सोस लेण्यांचा त्यास जन्मसिद्ध
तोच बीजांकुर धरी तुझा हेतू
विलासाची होशील मोगरी तू

तुला घेईन पोलके मखमलीचे
कूडी मोत्याची फूल सुवर्णाचे

हौस बाई पुरवीन तुझी सारी
परी यांवरी हा प्रलय महाभारी


प्राण ज्यांचे वर गुंतले सदाचे
कोड किंचीत पुरवीता नये त्यांचे
तदा बापाचे ह्र्दय कसे होते?
न ये वदता अनुभवी जाणती ते

देव देतो सद्गुणी बालकांना
काय म्हणुनी आम्हांस करंट्यांना?
लांब त्याच्या गावास जाऊनीया
गूढ घेतो हे त्यांस पुसूनीया

"गावी जातो" ऐकता त्याच गाली
पार बदलूनी ती बालसृष्टी गेली
गळा घालूनी करपाश रेशमाचा
वदे, "येते मी, पोर अज्ञ वाचा"

८ टिप्पण्या:

Mrs. Asha Joglekar म्हणाले...

खूप वर्षांनी वाचायला मिळाली ही कविता. पण एक कडवं असंही होतं ना
मुली शाळेतिल असती त्या चटोर
एकमेकी ला बोलती कठोर
काय बाई चित्तात धरायाचे
शहाण्याने ते शब्द वेडप्यांचे

Shrirang Pradhan म्हणाले...

हो बरोबर...

Nandkishore Muley म्हणाले...

गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या...डोळे भरल्या शिवाय रहात नाहीत ..आजूनही...

shirish sardeshpande म्हणाले...

उष्ण वारे वाहती नासीकांत , गुलाबाला सुकवती काश्मिरात
नंदनातील हलविती वल्लरीला, काेण बाेलले माझ्या छबेलीला..!!

Aniruddha Jadhav म्हणाले...

The best poem ever....

Suraj mane म्हणाले...

माझ्या लहानपणी माझे काका ताई साठी म्हणात तेव्हा खूप लहान होतो काही कळत नसत पण सारख ऐकू वाटायचं त्यावेळेस ऐकलेली ह्या कवितेचे ते शब्द आज ही ओठांवर असायचे .काही दिवसाूर्वी ते शब्द पुन्हा आठवले म्हणून मी ती कविता ऐकली यातला एक ना एक शब्द डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाही.
खरच आज कळाल शब्दातून भावना कश्या व्यक्त होतात ते

Suraj Mahamulkar म्हणाले...

माझे वडील हि कविता मी लहान असताना माझ्यासाठी म्हणत खूप खोल अर्थ आहे... अप्रतिम कविता...

Suraj Mahamulkar म्हणाले...

खूप छान