सोमवार, १७ जानेवारी, २०११

नको नको रे पावसा - इंदिरा संत

नको नको रे पावसा
असा धिंगाणा अवेळी :
घर माझे चंद्रमौळी
आणि दारात सायली;

नको नाचू तडातडा
असा कौलारावरून :
तांबे-सतेली-पातेली
आणू भांडी मी कोठून?

नको करू झोंबाझोंबी :
माझी नाजूक वेलण,
नको टाकू फुलमाळ
अशी मातीत लोटून;

आडदांडा नको येऊ
झेपावत दारातून :
माझे नेसूचे जुनेर
नको टाकू भिजवून;

किती सोसले मी तुझे
माझे एवढे ऐक ना :
वाटेवरई माझा सखा
त्याला माघारी आण ना;

वेशीपुढे आठ कोस
जा रे आडवा धावत;
विजेबाई, कडाडून
मागे फिरव पांथस्थ;

आणि पावसा, राजसा
नीट आण सांभाळून :
घाल कितीही धिंगाणा
मग मुळी न बोलेन;

पितळेची लोटीवाटी
तुझ्यासाठी मी मांडीन,
माझ्या सख्याच्या डोळ्यांत
तुझ्या विजेला पूजीन;

नको घालू रे पावसा
असा धिंगाणा अवेळी :
घर माझे चंद्रमौळी
आणि दारात सायली.

५ टिप्पण्या:

kshipra म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
kshipra म्हणाले...

उपक्रमात सहभागी व्हायची इच्छा आहे. कुठे संपर्क करायचा?

Shreerang म्हणाले...


Do you also have MP3 song for नको नको रे पावसा - इंदिरा संत ?
If yes please send email to shree5rang@gmail.com

Sndt म्हणाले...

या कवितेचा अर्थ

Unknown म्हणाले...

Ya kavitetil aashay sanga