सोमवार, २४ ऑक्टोबर, २०११

तुझ्याविषयीच्या मोहाचं झाड - कविता महाजन

तुझ्याविषयीच्या मोहाचं झाड
किती उंच उंच वाढतं आहे
बघ माझ्या मनात
एक अनोळखी जंगल सरसरत
उगवलंय माझ्या अंगभर

आभाळभर लख्ख चांदणं
पानातून घुमणारा वा-याचा आवाज
गच्च सावल्यांनी भरुन गेलेली जमीन
या सगळ्यांतून
दबक्या सावध पावलांनी
फिरतंय तुझ्या मौनाचं जनावर
कुठल्या पाणवठ्याच्या शोध घेतंय ते?
कशाची तहान आहे त्याला?

बघ
माझ्या शब्दांच्या बुंध्याला अंग घासून
सरकलंय ते इतक्यात पुढं
आणि मोहाची काही फुलं
टपटपलीत त्याच्या पाठीवर
उठलाय का शहारा?

आमोरासमोर अभे आहेत अखेर
माझा मोह आणि तुझं मौन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: