बुधवार, ७ मार्च, २००७

माझे मन तूझे झाले

माझे मन तूझे झाले
तुझे मन माझे झाले
माझे प्राण तूझे प्राण
उरले ना वेगळाले ॥

मला लागे तुझी आस
तुला जडे माझा ध्यास
तुला मला चोहीकडे
माझे तूझे होती भास ॥

माझ्यातून तू वाहसी
तुझ्यातही मी पाहसी
तूझ्यामाझ्यातले सारे
गुज माझ्यातुझ्यापाशी ॥

तुझी माझी पटे खूण
तुझी माझी हीच धून
तूझे प्राण माझे प्राण
माझे मन तूझे मन ॥

चांदोबाची गंमत - हरी सखाराम गोखले

ये ये ताई पहा पहा, गंमत नामी किती अहा!
चांदोबा खाली आला, हौदामध्यें बघ बुडला -
कसा उतरला ? केव्हा पडला ? पाय घसरला ?
कशास ऊलटे चालावे ? पाय नभाला लावावे ?
किती उंच हे आभाळ, त्याहूनी हौद किती खोल -
तरि हा ताई आई आई बोलत नाही,
चांदोबा तू रडू नको - ताई तूं मज हसूं नको !
किती किती हें रडलास, हौद रड्याने भरलास -
तोंड मळविलें, अंग ठेचलें, तेज पळाले,
उलटा चालू नको कधी, असाच पडशिल जलामधीं !

मंगळवार, ६ मार्च, २००७

चिमणीचा घरटा - बालकवी

चिंव् चिंव् चिंव् रे । तिकडे तू कोण रे?

'कावळे दादा, कावळे दादा, माझा घरटा नेलास, बाबा?'
'नाही ग बाई, चिऊताई, तुझा घरटा कोण नेई?'

'कपिला मावशी, कपिला मावशी, घरटे मोडून तू का जाशी?'
'नाही ग बाई मोडेन कशी? मऊ गवत दिले तुशी'

'कोंबडी ताई, कोंबडी ताई, माझा घरटा पाहिलास बाई?'
'नाही ग बाई मुळी नाही तुझा माझा संबंध काही?'

'आता बाई पाहू कुठे? जाऊ कुठे? राहू कुठे?'
'गरीब बिचाऱ्या चिमणीला सगळे टपले छळण्याला'

चिमणीला मग पोपट बोले ' का गे तुझे डोळे ओले?'
'काय सांगू बाबा तुला? माझा घरटा कोणी नेला?'

'चिमूताई चिमूताई, माझ्या पिंजऱ्यात येतेस, बाई?'
'पिंजरा किती छान माझा! सगळा शीण जाईल तुझा'

'जळो तुझा पिंजरा मेला! त्याचे नाव नको मला !'
'राहीन मी घरट्याविना!' चिमणी उडून गेली राना.

सोमवार, ५ मार्च, २००७

निर्झरास - बालकवी

गिरिशिखरे,वनमालाही
कड्यावरुनि घेऊन उड्या
घे लोळण खडकावरती,
जा हळुहळु वळसे घेत
पाचूंची हिरवी राने
वसंतमंडप-वनराई
श्रमलासी खेळुनि खेळ
ही पुढचि पिवळी शेते
झोप कोठुनी तुला तरी,
बालझरा तू बालगुणी दरीदरी घुमवित येई!
खेळ लतावलयी फुगड्या.
फिर गरगर अंगाभवती;
लपत-छपत हिरवाळीत;
झुलव गडे, झुळझुळ गाने!
आंब्याची पुढती येई.
नीज सुखे क्षणभर बाळ !
सळसळती गाती गीते;
हांस लाडक्या! नाच करी.
बाल्यचि रे! भरिसी भुवनी
***

बालतरू हे चोहिकडे
प्रेमभरे त्यावर तूहि
बुदबुद-लहरी फुलवेली
सौंदर्ये हृदयामधली
गर्द सावल्या सुखदायी
इवलाली गवतावरती
झुलवित अपुले तुरे-तुरे
जादूनेच तुझ्या बा रे?
सौंदर्याचा दिव्य झरा
या लहरीलहरीमधुनी ताल तुला देतात गडे!
मुक्त-मणि उधळून देई!
फुलव सारख्या भवताली.
हे विश्वी उधळून खुली
वेलीची फुगडी होई!
रानफुले फुलती हसती
निळी लव्हाळी दाट भरे.
वन नंदन बनले सारे!
बालसंतचि तू चतुरा;
स्फूर्ती दिव्य भरिसी विपिनी
***

आकाशामधुनी जाती
इंद्रधनूची कमान ती
रम्य तारका लुकलुकती
शुभ्र चंद्रिका नाच करी
ही दिव्ये येती तुजला
वेधुनि त्यांच्या तेजाने
धुंद हृदय तव परोपरी
त्या लहरीमधुनी झरती
नवल न, त्या प्राशायाला
गंधर्वा तव गायन रे मेघांच्या सुंदर पंक्ति;
ती संध्या खुलते वरती;
नीलारुण फलकावरती;
स्वर्गधरेवर एकपरी;
रात्रंदिन भेटायाला!
विसरुनिया अवघी भाने
मग उसळे लहरीलहरी
दिव्य तुझ्या संगीततति!
स्वर्गहि जर भूवर आला!
वेड लाविना कुणा बरे!
***

पर्वत हा, ही दरीदरी
गाण्याने भरली राने,
गीतमय स्थिरचर झाले!
व्यक्त तसे अव्यक्तहि ते
मुरलीच्या काढित ताना
धुंद करुनि तो नादगुणे
दिव्य तयाच्या वेणुपरी
गाउनि गे झुळझुळ गान
गोपि तुझ्या हिरव्या वेली
तुझ्या वेणुचा सूर तरी तव गीते भरली सारी.
वर-खाली गाणे गाणे!
गीतमय ब्रम्हांड झुले!
तव गीते डुलते झुलते!
वृंदावनि खेळे कान्हा;
जडताहि हसवी गाने;
तूहि निर्झरा! नवलपरी
विश्वाचे हरिसी भान!
रास खेळती भवताली!
चराचरावर राज्य करी
***

काव्यदेविचा प्राण खरा
या दिव्याच्या धुंदिगुणे
मी कवितेचा दास, मला
परि न झरे माझ्या गानी
जडतेला खिळुनी राही
दिव्यरसी विरणे जीव
ते जीवित न मिळे माते
दिव्यांची सुंदर माला
तूच खरा कविराज गुणी
अक्षय तव गायन वाहे तूच निर्झरा! कविश्वरा!
दिव्याला गासी गाणे.
कवी बोलती जगांतला,
दिव्यांची असली श्रेणी!
हृदयबंध उकलत नाही!
जीवित हे याचे नाव;
मग कुठुनि असली गीते?
ओवाळी अक्षय तुजला!
सरस्वतीचा कंठमणी
अक्षयात नांदत राहे!
***

शिकवी रे, शिकवी माते
फुलवेली-लहरी असल्या
वृत्तिलता ठायी ठायी
प्रेमझरी-काव्यस्फूर्ति
प्रगटवुनि चौदा भुवनी
अद्वैताचे रज्य गडे!
प्रेमशांतिसौंदर्याही
मम हृदयी गाईल गाणी
आणि असे सगळे रान
तेवि सृष्टीची सतार ही दिव्य तुझी असली गीते!
मम हृदयी उसळोत खुल्या!
विकसू दे सौंदर्याही!
ती आत्मज्योती चित्ती
दिव्य तिचे पसरी पाणी!
अविच्छिन्न मग चोहिकडे!
वेडावुनि वसुधामाई
रम्य तुझ्या झुळझुळ वाणी!
गाते तव मंजुळ गान,
गाईल मम गाणी काही!
***

शुक्रवार, २ मार्च, २००७

अनंत - कुसुमाग्रज

एकदा ऐकले
काहींसें असें
असीम अनंत
विश्वाचे रण
त्यात हा पृथ्वीचा
इवला कण
त्यांतला आशिया
भारत त्यांत
छोट्याशा शहरीं
छोट्या घरांत
घेऊन आडोसा
कोणी 'मी' वसें
क्षुद्रता अहो ही
अफाट असें!
भिंतीच्या त्रिकोनी
जळ्मट जाळी
बांधून राहती
कीटक कोळी
तैशीच सारी ही
संसाररीती
आणिक तरीही
अहंता किती?
परंतु वाटलें
खरें का सारें?
क्षुद्र या देहांत
जाणीव आहे
जिच्यात जगाची
राणीव राहे!
कांचेच्या गोलांत
बारीक तात
ओतीत रात्रीत
प्रकाशधारा
तशीच माझ्या या
दिव्याची वात
पाहते दूरच्या
अपारतेंत!
अथवा नुरलें
वेगळेंपण
अनंत काही जें
त्याचाच कण!
डोंगरदऱ्यांत
वाऱ्याची गाणीं
आकाशगंगेत
ताऱ्यांचे पाणीं
वसंतवैभव
उदार वर्षा
लतांचा फुलोरा
केशरी उषा....
प्रेरणा यांतून
सृष्टीत स्फुरे
जीवन तेज जें
अंतरी झरे
त्यानेच माझिया
करी हो दान
गणावे कसे हें
क्षुद्र वा सान?

अनंत - बालकवी

अनंत तारा नक्षत्रे ही अनंत या गगनात
अनंत दीप्ती, अनंत वसुधा, हे शशिसूर्य अनंत.
वरती खाली सर्व साठले वातावरण अनंत,
माप कशाचे, कुणा मोजिता, सर्व अनंत अनंत.
कितेक मानव झटती, करिती हाडाचेही पाणी,
अनंत वसुधा आजवरी हो परी मोजली कोणी!
म्हणोत कोणी 'आम्ही गणिला हा ग्रह- हा तारा,'
परंतु सांगा कुणी मोजिला हा सगळाच पसारा?
विशाल वरती गगन नव्हे, हे विश्वाचे कोठार,
उदात्ततेचा सागर हा, चिच्छांतीचा विस्तार.
कुणी मोजिला, कुणास त्याची लांबीरूंदी ठावी?
फार कशाला दिग्वनिंताची तरी कुणी सांगावी?
अनंत सारे विश्व जाहले अनंतात या लीन,
क्षुद्र मानवा, सांग कशाचा बाळगिसी अभिमान?
तव वैभव हे तुझे धनी ही, हे अत्युच्च महाल,
जातिल का गगनास भेदूनि? अनंत का होतील?
तुझ्या कीर्तिचे माप गड्या का काळाला मोजील!
ज्ञान तुझे तू म्हणशी 'जाइल', कोठवरी जाईल?
'मी' 'माझे' या वृथा कल्पना, तू कोणाचा कोण?
कितेक गेले मी मी म्हणता या चक्री चिरडून.

गुरुवार, १ मार्च, २००७

रांगोळी घातलेली पाहून - राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज

"साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे;
नित्याच्या अवलोकने परि किती होती जगी आंधळे!
रांगोळी बघुनी इत:पर तरी होणे तयी शाहणे,"
रांगोळी बघुनीच केशवसुता हे आठवे बोलणे.

रांगोळीत तुझ्या विशेष गुण जो आर्या! मला वाटतो,
स्पष्टत्वे इतुक्या अशक्य कथणे वाटे तुला काय तो?
जो तूते वदवे न अर्थ मनिचा तोंडात आला तरी,
तो मी बोलुनि दाखवीन अगदी साध्याच शब्दी परी.

चैत्री आंगण गोमये सकलही संमार्जिले सुंदर,
रांगोळीहि कुणी तिथे निजकरी ती घातली त्यावर.
ज्यां आमंत्रण त्या घरी मुळि नसे ऐशा स्त्रियांलागुनी
त्या चिन्हांतुनि हा विशेष निघतो आहे गमे मन्मनी-

या या! आज असे सुरेख हळदीकुंकू पहा या स्थली
बत्तासे बहु खोबरे हरभरे खैरात ही चालली!
ठावे कोण न जात येत- दिधले कोणास आमंत्रण;
नाही दाद घरात ही मुळि कुणा; दे धीर हे लक्षण.

संधी टाकुनि छान फौज तुमची कोठे पुढे चालली?
बायांनो! अगदी खुबी विसरता तैलंगवृत्तीतली !
नाते, स्नेह, निदान ओळख तुम्हा येथे न आणी तरी,
या; आमंत्रण राहुं द्या; परि शिरा सार्‍याजणी या घरी!

लाभे ते फुकटातलेच हळदीकुंकू तुम्हाला जरी,
होई काय नफा अचानक तयामाजी न कित्तीतरी?
ही आगंतुकवृत्ति आपण जरी धिक्कारिली यापरी,
प्राप्ती चार घरे उगीच फिरुनी होईल का हो तरी?

चाले काय असे उगीच भिऊनी? तुम्हीच सांगा खरे!
या डोळा चुकवून नीट; डरतां आता कशाला बरे?
कोणाच्या नजरेत येइल तरी होणे असे काहि का?
केला का खटला कुणावर कुणी ऐसा अजुनी फुका!

बायांनो! तर या, नकाच दवडू संधी अशी हातची,
जा जे काही मिळेल तेच भरल्या रस्त्यातुनी खातची!
कामे ही असली हितावह कधी होतील का लाजुनी?
या-या-या तर धावुनी; त्यजु नका रीती पुराणी जुनी!

कोणाच्या घरचे असेल हळदीकुंकू कधी नेमके
ज्या बायांस नसेल हे चुकुनिया केव्हा तरी ठाउके,
रांगोळी बघुनी इत:पर तरी होणे तयी शाहणे,
कोठे चालत काय काय अगदी हे नेहमी पाहणे!