बुधवार, ७ मे, २००८

घाटातील वाट - सरिता पदकी

घाटातील वाट,
काय तिचा थाट,
मुरकते गिरकते,
लवते पाठोपाठ ।।

निळी निळी परडी,
कोणी केली पालथी,
पान फुलं सांडली,
वर आणि खालती ।।

खाली खोल दरी,
वर उंच कडा,
भला मोठा नाग,
जणू वर काढून फणा ।।

भिऊ नका कोणी,
पाखरांची गाणी,
सोबतीला गात गात,
खळाळतं पाणी ।।

मंगळवार, २९ एप्रिल, २००८

बाभळी - इंदिरा संत

लवलव हिरवीगार पालवी काट्यांची वर मोहक जाळी
घमघम करिती लोलक पिवळे फांदी तर काळोखी काळी

झिरमिर झरती शेंगा नाजूक वेलांटीची वळणे वळणे
त्या सार्‍यातूनी झिरमिर झरती रंग नभाचे लोभसवाणे

कुसरकलाकृती अशी बाभळी तिला न ठावी नागर रिती
दूर कुठेतरी बांधावरती झुकून जराशी उभी एकटी

अंगावरती खेळवी राघू लागट शेळ्या पायाजवळी
बाळ गुराखी होऊनीया मन रमते तेथे सांज सकाळी

येथे येऊन नवेच होऊन लेऊन हिरवे नाजूक लेणे
अंगावरती माखूनी अवघ्या धुंद सुवासिक पिवळे उटणे..

मरणांत खरोखर जग जगते - भा.रा.तांबे

मरणांत खरोखर जग जगते
अधिं मरण अमरपण ये मग ते ॥

अनंत मरणे अधीं मरावी
स्वातंत्र्याची आस धरावी
मारिल मरणचि मरणा भावी
मग चिरंजीवपण ये मग ते ॥ १ ॥

सर्वस्वाचे दान अधीं करी
सर्वस्वच ये तुझ्या घरी
सर्वस्वाचा यज्ञ करी तरि
रे! स्वयें सैल बंधन पडते ॥ २ ॥

स्वातंत्र्याचा एकचि ठावा
केवळ यज्ञचि मजला ठावा
यज्ञ मार्ग ! हो यज्ञ विसावा
का यज्ञाविण काही मिळते? ॥ ३ ॥

सीता सति यज्ञीं दे निज बळि
उजळुनि ये सोन्याची पुतळी
बळी देऊनी बळी हो बळी
यज्ञेच पुढे पाऊल पडते ॥ ४ ॥

यज्ञिं अहर्निश रवि धगधगतो
स्वसत्वदाने पाश छेदितो
ज्योतिर्गण नव जन्मुनि जगतो
रे स्वभाव हा! उलटे भलते ॥ ५ ॥

प्रकृति-गती ही मनिं उपजुनियां
उठा वीर कार्पंण्य त्यजुनिया;
'जय हर!'गर्जा मातेस्तव या!
बडबडुनी काही का मिळते? ॥ ६ ॥

गुरुवार, २१ फेब्रुवारी, २००८

लिलीची फुले - पु. शि. रेगे

लिलीची फुले तिने
एकदा चुंबिता, डोळां
पाणी मी पाहिले....!

लिलीची फुले आता
कधीही पाहता, डोळां
पाणी हे साकळे....!

- पु. शि. रेगे

मंगळवार, १९ फेब्रुवारी, २००८

तहान - म. म. देशपांडे.

सारा अंधारच प्यावा
अशी लागावी तहान,
एका साध्या सत्यासाठी
देता यावे पंचप्राण ।।

व्हावे एव्हढे लहान
सारी मने कळों यावी,
असा लागावा जिव्हाळा
पाषाणाची फुले व्हावी ।।

फक्त मोठी असो छाती
सारे दुःख मापायला
गळो लाज गळो खंत
काही नको झाकायला ।।

राहो बनून आभाळ
माझा शेवटला श्वास
मना मनात उरो
फक्त प्रेमाचा सुवास ।।

- म. म. देशपांडे.

सोमवार, १८ फेब्रुवारी, २००८

कोठुनि येते मला कळेना - बालकवी

कोठुनि येते मला कळेना
उदासीनता ही हृदयाला
काय बोचते ते समजेना
हृदयाच्या अंतर्हृदयाला ।।

येथे नाही तेथे नाही,
काय पाहिजे मिळावयाला?
कुणीकडे हा झुकतो वारा?
हाका मारी जीव कुणाला?

मुक्या मनाचे मुके बोल हे
घरे पाडिती पण हृदयाला
तीव्र वेदना करिती, परि ती
दिव्य औषधी कसली त्याला !

- बालकवी

बुधवार, ६ फेब्रुवारी, २००८

अनामवीरा - कुसुमाग्रज

अनामवीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्त
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात

धगधगता समराच्या ज्वाला या देशासाठी
जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी

मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा
मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा

जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव

जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान
सफल जाहले तुझेच हे रे तुझे बलिदान

काळोखातूनी विजयाचा हे पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्यूंजय वीरा