मंगळवार, २८ एप्रिल, २०२०

वेलांटी

पीत केशरी पातळ चोळी हिरवी अंगात
नेसुनिया आपलेच हसू आलीस दारात

स्वागताचे तुझ्या शब्द जन्मोजन्मी घोकलेले
भाग्य-उजरीच्या वेळी कोसळोनी मौनी झाले

जुळविता तुझ्या डोळां अक्षरे मी आयुष्याची
उरे वेलांटीच अंती तुझ्या वक्र भिवयीची

पण उभी का तू अशी? सोड दाराची चौक्ट
तुझ्या ओठांच्या रेषांशी माझी अडली ना वाट!

वाट अडू दे अशीच रात्र इथेच पडू दे
तुझ्या देहाच्या दिव्याशी तम गहिरे होऊ दे, माझी सावली सरु दे



गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२०

प्राजक्ताची फुले

टप‌ टप‌ पडती अंगावरती प्राजक्ताची फुले
भिर‌ भिर‌ भिर‌ त्या तालावरती गाणे अमुचे जुळे !

कुरणावरती, झाडांखाली
ऊन सावली विणते जाळी
येतो वारा पाहा भरारा, गवत खुशीने डुले !

दूर दूर हे सूर वाहती
उन्हात पिवळ्या पाहा नाहती
हसते धरती, फांदीवरती हा झोपाळा झुले !

गाणे अमुचे झुळझुळ वारा
गाणे अमुचे लुकलुक तारा
पाऊस, वारा, मोरपिसारा या गाण्यातुन फुले !

फुलांसारखे सर्व फुला रे
सुरात मिसळुनी सूर, चला रे
गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे !

मंगळवार, १४ जानेवारी, २०२०

बसलेले: संजीवनी मराठे, पद्मा गोळे, कवि यशवंत, बा.भ.बोरकर, वि.वा.शिरवाडकर (कुसुमाग्रज) ऊभे: मंगेश पाडगाँवकर, वसंत बापट, ग.दी.माडगुळकर, वा.रा.कांत

सोमवार, १३ जानेवारी, २०२०

सांध्यसुंदरी

इंद्रनील चंद्रकांत सांध्यसुंदरी ही
येइ हसत मधुर मंद विश्वामंदिरीं ही .....

उंबर्‍यांत धुउनि उन्हे धूळ माणकांची
मूर्ति सजल-पारिजात-कांत पावलांची
नेसुनि ये वसन नरम तलम अंजिरी ही ....

मंदानिल दुडदुडुनी बिलगले पदांला
उचलुनि त्यां मृदुल करें लाविलें उराला
चुंबुनि त्यां मोहरली स्नेहमंजिरी ही ....

कुरवाळुनि बोलवि ही बोबडया खगांना
लावुनि गालांस बोट खुलवि वल्लरींना
एक एक नवलदिवा लावि अंबरीं ही ....

पिककंठी जलवंती उघडुनी उराला
दावि इंद्रचापवर्णचित्ररत्नमाला
कुजबुजली गुज तिजशीं स्वर्गमाधुरी ही ....

झाले छायार्द्र नेत्र भूमिमाउलीचे
वात्सल्ये जड झाले पयद माउलींचे
स्वागद हें भावोत्कट बघुनि बावरी ही .....

व्यथित मना ... कर जोडुनि स्मर ‘शुभं करोति’
स्थिरचर एकाग्रचित्त जाहलें सभोतीं
वाहाया तुजवर ये शांतिनिर्झरी ही

शनिवार, १७ फेब्रुवारी, २०१८

उनाड व्हावे - दि. पु. चित्रे

उनाड व्हावे रक्त इथे अन
डोळ्यांना पालवी फुटावी
अन श्वासांच्या संथ झऱ्यांतून
लकेर हळवी तरळत जावी
झुळझुळणाऱ्या जिवंततेला
मरणाच्या मग खुणा पटाव्या
छातीच्या गहिऱ्या मेघातुन
अदृष्टाच्या विजा पळाव्या
दूर असावे स्वतःपासुनि
स्वतःपणाचा अर्थ नुरावा
फक्त वाहणाऱ्या ओळींना
अशाश्वताचा सूर कळावा
उनाड व्हावे रक्त इथे अन
फक्त निळे आकाश उरावे
तंद्रीच्या धूसर वाऱ्यावर
अन ताऱ्यांचे स्वप्न झुरावे

मंगळवार, ११ जून, २०१३

आला क्षण...गेला क्षण

गडबड घाई जगात चाले,
आळस डुलक्या देतो पण;
गंभीरपणे घडय़ाळ बोले -
‘आला क्षण-गेला क्षण’

घडय़ाळास या घाई नाही,
विसावाही तो नाही पण;
त्याचे म्हणणे ध्यानी घेई -
‘आला क्षण-गेला क्षण!’

कर्तव्य जे तत्पर त्यांचे
दृढ नियमित व्हावयास मन,
घडय़ाळ बोले आपुल्या वाचे -
‘आला क्षण-गेला क्षण’

कर्तव्याला विमुख आळशी
त्यांच्या हृदयी हाणीत घण,
काळ -ऐक! गातो आपुल्याशी
‘आला क्षण-गेला क्षण!’

लवाजम्याचे हत्ती झुलती
लक्ष त्यांकडे देतो कोण,
मित रव जर हे सावध करती -
‘आला क्षण-गेला क्षण’

आनंदी आनंद उडाला,
नवरीला वर योग्य मिळाला!
थाट बहुत मंडपात चाले -
भोजन, वादन, नर्तन, गान!
काळ हळू ओटीवर बोले -
‘आला क्षण-गेला क्षण!’

‘कौतुक भारी वाटे लोकां
दाखविण्या पाहण्या दिमाखा,
तेणे फुकटची जिणे होतसे!
झटा! करा तर सत्कृतीला!’
सुचवीत ऐसे, काळ वदतसे -
‘क्षण आला, क्षण गेला!’

वार्धक्य जर सौख्यात जावया
व्हावे, पश्चात्ताप नुरुनिया,
तर तरुणा रे! मला वाटते,
ध्यानी सतत अपुल्या आण
घडय़ाळ जे हे अविरत वदते-
‘आला क्षण-गेला क्षण’

शनिवार, २३ फेब्रुवारी, २०१३

मावळतीला


मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले
जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले
जखम जिवाची हलके हलके भरून यावी
तसे फिकटले, फिकट रंग ते मग ओसरले.

घेरित आल्या काळोखाच्या वत्सल छाया
दुःखाचीही अशी लागते अनवट माया
आक्रसताना जग भवतीचे इवले झाले
इवले झाले आणि मजला घेरित आले.

मी दुःखाच्या कुपीत आता मिटते आहे
एक विखारी सुगंध त्याचा लुटते आहे
सुखदुःखाच्या मधली विरता सीमारेषा
गाठ काळजातली अचानक सुटते आहे.

जाणिव विरते तरिही उरते अतीत काही
तेच मला मम अस्तित्वाची देते ग्वाही
आतुरवाणी धडधड दाबुन ह्रदयामधली
श्वास आवरून मन कसलीशी चाहुल घेई.

हलके हलके उतरत जाते श्वासांची लय
आता नसते भय कसले वा कसला संशय
सरसर येतो उतरत काळा अभेद्य पडदा
मी माझ्यातुन सुटते, होते पूर्ण निराशय.

[संकलक: शीतल भांगरे]