सोमवार, २६ फेब्रुवारी, २००७

मातृवंदना - ग.दि.माडगूळकर

मातृवंदना

दिला जन्म तू,विश्व हे दाविलेस
किती कष्ट माये,सुखे साहिलेस,
जिण्यालागि आकार माझ्या दिलास
तुझ्या वंदितो माउली,पाउलांस

गुरु आद्य तू,माझिया जीवनात
तुवा पेरिली धर्मबीजे मनात,
प्रपंचात सत्पंथ तू दाविलास
तुझ्या वंदितो माउली,पाउलांस

तुझा कीर्तिविस्तार माझा प्रपंच
कृपेने तुझ्या रंगला रंगमंच,
वठे भूमिका पाठ जैसा दिलास
तुझ्या वंदितो माउली,पाउलांस

तुझे थोर संस्कार आचार झाले
तुझे यत्नप्रामाण्य सिध्दीस गेले,
तुझ्या चिंतने,लोभ पावे निरास
तुझ्या वंदितो माउली,पाउलांस

उमेचे,रमेचे,तसे शारदेचे
जपध्यान तैसे तुझे जन्मदेचे,
तुझ्या प्रेरणेने यशस्वी प्रवास
तुझ्या वंदितो माउली,पाउलांस

५ टिप्पण्या:

vdesh म्हणाले...

नमस्कार,

आपले काव्य संकलन आवडले. गदिमांची मातृवंदना कविता वाचताना त्यावरील एक दुर्दैवी गोष्ट आणि कवीची कविता करण्याची शक्ती सांगतो: (व्याकरणातील चूकांबद्दल माफी!)

गदीमांच्या आईला, मला वाटते "माई" म्हणायचे त्यांना, यांना महाराष्ट्रातील "आदर्श माता" पुरस्कार मिळण्याचा सोहळा चाललेला असतानाच गदीमांच्या आकस्मिक निधनाची बातमी आली.

नंतर त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळेस वैकुंठ स्मशानभूमीत, (मला वाटते) सुधीर मोघ्यांना माडगुळकरांच्या "मातृवंदना" आठवत, खालील ओळी सुचल्या: (आठवतात त्याप्रमाणे लिहीत आहे):

तुझ्या वंदीतो माऊली पाऊलास
सुखाने घडो अंतीचा हा प्रवास
क्शमा मागतो जन्मदात्री तुझी मी
निघालो तुझ्या आधी वैकुंठधामी ॥

धन्यवाद
विकास देशपांडे

Alvika म्हणाले...

ह्या कवितेची चाल कशी लावली आहे ?

Alvika म्हणाले...

ह्या कवितेची चाल कशी लावली आहे ?

Alvika म्हणाले...

हे कोणी लिहिले आहे?मी नव्हे...

Dr. Rahul Deshpande म्हणाले...

राहुल घोरपडे यांनी याला चाल लावली असून सुरेश वाडकर यांनी हे गीत गायले आहे
ऑनलाइन सापडू शकेल