सोमवार, १२ जुलै, २०१०

माणुसपण - कुसुमाग्रज


प्रसन्न झाला देव मानवा
म्हणे, ’माग तुज काय हवे ते’,
’शस्त्र हवे मज’, माणूस वदला
’साध्य सर्व हो पराक्रमाते’


शस्त्र मिळाले, हो समरांगण
अवघ्या भूचे हृदय विदारी
माखुनिया रक्तात राहिला
पुन्हा उभा देवाच्या द्वारी!


’काय हवे तुज ?’ शस्त्र न पुरते-
करील शास्त्रच मंगल जीवन
ज्ञानसाधनी ये ईश्वरता
स्वर्गधरेचे करीन मीलन


शास्त्र मिळाले, शस्त्र मिळाले
स्वर्ग परी स्वप्नातच राही.
मानव हतबल आणिक हताश
पुन्हा प्रभुच्या सन्निध येई.


’काय हवे तुज ?’, ’वावरलो मी-
वाट दिसेना या तिमिरांतून
देव म्हणे, तुज जवळीच आहे
दीप लाव तो, तव माणुसपण!


लोकसत्ता. मंगळवार, २ ऑगस्ट २००५

४ टिप्पण्या:

Sameer Samant म्हणाले...

छानच..... धन्यवाद..! कवी जाणून घ्यायला आवडेल...!

Maria Mcclain म्हणाले...
ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.
Dhananjay म्हणाले...

@padmakar,
ही कविता कुसुमाग्रजांची आहे, संग्रह : मराठी माती

Unknown म्हणाले...

कुसुमाग्रज