हें कोण बोललें बोला? 'राजहंस माझा निजला!'
दुर्दैवनगाच्या शिखरीं। नवविधवा दुःखी आई!
तें हृदय कसें आईचें । मी उगाच सांगत नाहीं ।
जें आनंदेही रडतें । दु:खांत कसें तें होइ--
हें कुणी कुणां सांगावें!
आईच्या बाळा ठावें !
प्रेमाच्या गांवा जावें--
मग ऐकावें या बोला । 'राजहंस माझा निजला!"
मांडीवर मेलें मूल । तो हृदया धक्का बसला ।
होउनी कळस शोकाचा । भ्रम तिच्या मानसीं बसला ।
मग हृदय बधिरची झलें । अति दुःख तिजवि चित्ताला ।
तें तिच्या जिवाचें फूल ।
मांडीवर होत मलूल!
तरि शोकें पडुनी भूल--
वाटतची होतें तिजला। 'राजहंस माझा निजला!'
जन चार भोंवतीं जमले। मृत बाळा उचलायाला।
तो काळ नाथनिधनाचा। हतभागि मना आठवला।
तो प्रसंग पहिला तसला। हा दुसरा आतां असला!
तें चित्र दिसे चित्ताला!
हें चित्र दिसे डोळ्यांला!
निज चित्र चित्तनयनांला,
मग रडुने वदे ती सकलां। 'राजहंस माझा निजला!'
करुं नका गलबला अगदीं। लागली झोंप मम बाळा!
आधींच झोंप त्या नाहीं। खेळाचा एकच चाळा!
जागतांच वाऱ्यासरसा। खेळाचा घेइल आळा!
वाजवूं नका पाऊल!
लागेल तया चाहूल!
झोंपेचा हलका फूल!
मग झोपायाचा कुठला! राजहंस माझा निजला!
हें दूध जरासा प्याला। आतांसा कोठें निजला!
डोळ्याला लागे डोळा। कां तोंच भोवतीं जमलां?
जा! नका उठवुं वेल्हाळा। मी ओळखतें हो सकलां!
तो हिराच तेव्हा नेला!
हिरकणीस आतां टपलां!
परि जिवापलिकडे याला--
लपवीन! एकच मजला! राजहंस माझा निजला!
कां असलें भलतें सलतें। बोलतां अमंगळ याला!
छबकड्यावरुनि माझ्या या। ओवाळुनि टाकिन सकलां!
घेतें मी पदराखालीं। पाहूंच नका लडिवाळा!
मी गरीब कितिही असलें।
जरि कपाळ माझें फ़ूटलें।
बोलणें तरी हें असलें--
खपणार नाहिं हो मजला! राजहंस माझा निजला!
हें असेच सांगुनि मागें। नेलात जिवाचा राजा।
दाखविलाहि फिरुनी नाहीं। नाहिंत का तुम्हां लाजा?
न्यावयास आतां आलां। राजहंस राजस माझा!
हा असा कसा दुष्टावा?
कोणत्या जन्हिंचा दावा?
का उगिच गळा कापावा--
पाहुनी गरिब कोणाला। राजहंस माझा निजला!
मंगळवार, १३ फेब्रुवारी, २००७
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
९ टिप्पण्या:
Dear Padmakar,
amazing collection!!
Great poem! Thanks a lot for collecting and publishing these poems.
Chaan kavita aahe ...
Bheten nau mahinyani hya kavitechi aathvan zaali. Hi kavita pahilyanda vaachli aaj. Share kelyabaddal manaave titke aabhar thodech aahet 🙏🙏🙏
मराठी साहित्यातील महान कविता.अतिऔचित्य आणि औचित्य हानी असणारी ही कविता अजरामर आहे.आपल्या माध्यमातून ही कविता वाचण्यात आली. आभारी आहे.
नितान्त सुंदर रचना आणि मानवी संवेदना बधिर करणारी समस्या सांगणारे काव्य! रसिकांसाठी उपलब्ध केल्याबद्दल धन्यवाद पद्माकरजी.
धन्यवाद
सुंदर रूपक... करूण रसातील सुंदर कविता!
आभार, आपल्यामुळे जुने साहित्य वाचायला मिळाले .
टिप्पणी पोस्ट करा