या पाणवठ्यावर आले किती घट गेले
किती डुबडुबले अन बुडले वाहुनि गेले
किती पडले तसेच काठावरती
किती येतील अजुनि नाही त्यांना गणती
हा असा राहु दे असाच खाली पदर
हा असा राहु दे असाच ओला अधर
ओठात असु दे ओठ असे जुळलेले
डोळ्यात असु दे स्वप्न निळे भरलेले
संपेल कधी ही शोधायाची हाव
फोडिले दगड दशलक्ष दिसेना देव
पसरतो शेवटी हात तुझ्या दारात
अश्रुत भिजावी विझताना ही ज्योत
ही वाट वेगळी तुझी नसे रे त्यांची
ही दुनिया आहे केवळ हसणाऱ्यांची
दाखवू नको रे डोळे ते भिजलेले
जा तुडवित काटे, रक्ताने जरी भरलेले
काळोख खुळा अन खुळीच काळी राणी
संकोच मावला मिठीत सुटली वेणी
अंजिरी चिरी विस्कटे सुटे निरगाठ
ओठात चुंबने भरली काठोकाठ
गुदमरली काजळकाठावरची धुंदी
कळवळली हिरवी तळटाचेवरची मेंदी
पाळणा झुले मांडीवर मिटले ओठ
पदरातुनी फिरली एक तान्हुली मूठ
ओठात अडकले चुंबन रुसले गाल
कोयरीत हिरवा चुडा विरघळे लाल
घालता उखाणा फणा रुपेरी खोल
अंकुरले अमृत ढळता नाभी कमळ
बुधवार, १६ मे, २००७
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा