गुरुवार, १६ डिसेंबर, २०१०

डोळा वाटुली संपेना - इंदिरा संत

इथे रंगली पंगत
मिटक्यांची भुरक्यांची :
साधासुधा माझा हात,
बाळजीभ अमृताची;

इथे चालला अभ्यास,
इथे झाली भातुकली,
गोष्टी, गाणी नि मस्करी :
खोली भरून राहिली;

इथे घडले पतंग
इथे फिरला भोवरा,
इथे हदगा मांडला,
इथे खुडला मोगरा;

खेळा-शाळेच्या मागून
दूर दूर दिसाकाठी;
सांजावता, दारामधे
कमरेला घट्ट मिठी.

दिसामाशी वाढताना
घर झाले हे लहान;
पालवीत पंख नवे
गेली त्याच दारातून!

सांज टळली तरीही
दार लावावे वाटेना,
"वळेल का कुणी मागे?"
डोळा वाटुली संपेना....

--संपावया हवी वाट,
लावावया हवा दिवा;
पोटासाठी मुकाट्याने
हवा टाकायला तवा!

सांगावा - इंदिरा संत

किती धाडला सांगावा:
मला येऊनिया न्यावे;
चोळमोळा झाला जीव,
किती त्याला शिणवावे!

किती पाहिली मी वाट
असे सांगावे धाडून;
केली कितीद तयारी
सारे काही आवरून

अंगणात संमार्जन,
दारा सतेज तोरण,
सारविल्या भुईवरी
स्वस्तिकाचे रेखाटण;

चूलबोळकी, बाहुल्या
दडपिल्या पेटाऱ्यांत;
लख्ख लख्ख सारे काही
निघायच्या तयारीत.

कसा नसेल पोचला
एक सांगावा येथून?
कसे नसेल ठाऊक
इथे मोजते मी क्षण?

दक्षिणेच्या झंझावाता,
कधी येणार धावत :
माझे मातीचे हे घर
कधी घेणार मिठीत?

सोमवार, ३० ऑगस्ट, २०१०

बरसात - शांता शेळके

संबंधांचे अर्थ कधीच लावू नयेत
त्यांचा फक्त नम्र कृतज्ञतेने स्वीकार करावा
जसा पाण्याचा झुळझुळनितळ जिव्हाळा
जुळलेल्या समंजस ओंजळीत धरावा.

संबंधांचे धागे कधीच उलगडू नयेत
ते फक्त प्राणांभोवती सहज घ्यावेत लपेटून,
जसे हिवाळ्यातल्या झोंबऱ्या पहाटगारठ्यात
अंगांगी भिनवीत राहावे कोवळे धारोष्ण ऊन्ह.

संबंध तुटतानाही एक अर्थ आपल्यापुरता....
एक धागा... जपून ठेवावा खोल हृदयात
एखादे रखरखीत तप्त वाळ्वंट तुडवताना
माथ्यावर आपल्यापुरती खासगी बरसात...

मंगळवार, १७ ऑगस्ट, २०१०

डोंगरी शेत - नारायण सुर्वे

[कै. कवी नारायण सुर्वे ह्यांना आदरांजली]

डोंगरी शेत माझं गं मी बेनू किती?

आलं वरिस राबून मी मरावं किती?

कवळाचे भारे बाई गं घेऊन चढावं किती?
आडाचं पाणी बाई गं पाणी वढावं किती?
घरात तान्हा माझा गं तान्हा रडंल किती?
तान्ह्याचं रडं ऐकून पान्हा येईल किती?

आलं आलं वरीस जमिन नांगरुन
उभं पीक नाचे सोन्यानं फुलून
पर एक मेला सावकार ठोला
हिसकून घेतो बाई सोन्याचा गोळा
असं उपाशी राहून आम्ही मरावं किती?

या संसारा बाई सांजी येईना
रक्त गाळून अंगा धडूत मिळंना
कष्टाचं फळ बाई पदरात पडंना
टीचभर पोटाला, हातभर देहाला जपावं किती?

अक्षय ऱ्हाया कुंकू कपाळा
संसार वेलीच्या फुलवाया फुला
रुप नवं आणू माय धरतीला

तोडू जुलमाचे काच, हे रावणी फास एकीचं निशाण हाती

सोमवार, २ ऑगस्ट, २०१०

क्षितीज रुंद होत आहे - नारायण सुर्वे

आज माझ्या वेदनेला
अर्थ नवा येत आहे
आणि मेघांच्या डफावर
थाप बिजली देत आहे
आज मरण आपुल्याच
मरणाला भीत आहे
आणि मृत्युंजयी आत्मा
पुन्हा धडक देत आहे
आज शुष्क फांद्यावर
बहर नवा येत आहे
भूमीच्या गर्भामधुनी
बीज हुंकार देत आहे
आज सारे गगन थिटे
नजरेला येत आहे
काळोखाच्या तबकडीत
सूर्य गजर देत आहे
आज तडकलेले मन
एकसंध होत आहे
आणि उसवलेले धागे
गुंफूनीया देत आहे
आज माझ्या कोरड्या गा
शब्दात आग येत आहे
आणि नव्या सृजनाचे
क्षितीज रुंद होत आहे.

माझी आई - नारायण सुर्वे

जेव्हा तारे विझू लागत
उंच भोंगे वाजू लागत
पोंग्याच्या दिशेने वळत
रोज दिंड्या जात चालत
झपाझप उचलीत पाय
मागे वळून बघीत जाय
ममतेने जाई सांगत
नका बसू कुणाशी भांडत
वर दोन पैसे मिळत.

दसऱ्याच्या आदल्या दिनी
जाई पाचांसह घेऊनी
फिरू आम्ही आरास बघत
साऱ्या खात्यांतून हुंदडत
किती मजा म्हणून सांगू
शब्दासाठे झालेत पंगू
भिंगऱ्या पेपेटे घेऊन
फुग्यांचे पतंग झोकून
जात असू पक्षी होऊन.

एक दिवस काय झाले
तिला गाडीतून आणले
होते तिचे उघडे डोळे
तोंडातून रक्त भळभळे
जोडीवालीण तिची साळू
जवळ घेत म्हणाली बाळू
मिटीमिटी पाहात होतो
माझे छत्र शोधीत होतो
आम्ही आई शोधीत होतो.

त्याच रात्री आम्ही पांचानी
एकमेकास बिलगूनी
आईची मायाच समजून
घेतली चादर ओढून
आधीचे नव्हतेच काही
आता आई देखील नाही
अश्रूंना घालीत अडसर
जागत होतो रात्रभर
झालो पुरते कलंदर.

सोमवार, १२ जुलै, २०१०

माणुसपण - कुसुमाग्रज


प्रसन्न झाला देव मानवा
म्हणे, ’माग तुज काय हवे ते’,
’शस्त्र हवे मज’, माणूस वदला
’साध्य सर्व हो पराक्रमाते’


शस्त्र मिळाले, हो समरांगण
अवघ्या भूचे हृदय विदारी
माखुनिया रक्तात राहिला
पुन्हा उभा देवाच्या द्वारी!


’काय हवे तुज ?’ शस्त्र न पुरते-
करील शास्त्रच मंगल जीवन
ज्ञानसाधनी ये ईश्वरता
स्वर्गधरेचे करीन मीलन


शास्त्र मिळाले, शस्त्र मिळाले
स्वर्ग परी स्वप्नातच राही.
मानव हतबल आणिक हताश
पुन्हा प्रभुच्या सन्निध येई.


’काय हवे तुज ?’, ’वावरलो मी-
वाट दिसेना या तिमिरांतून
देव म्हणे, तुज जवळीच आहे
दीप लाव तो, तव माणुसपण!


लोकसत्ता. मंगळवार, २ ऑगस्ट २००५

बुधवार, ७ जुलै, २०१०

माय - स.ग. पाचपोळ

[फॉरवर्डस मधून आलेल्या एका ईमेलमध्ये खालील कविता मिळाली. मूळ फॉरवर्डमध्ये नारायण सुर्वे कवी असल्याचा उल्लेख केला गेला होता. पण प्रणव प्रियांका प्रकाशा ह्या तरुण, जाणकार कवींनी सुचवलेल्या दुरुस्तीनुसार स.ग.पाचपोळ हे मूळ कवी आहेत. त्याप्रमाणे बदल करत आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की जितेंद्र जोशी ह्यांनी देखिल एका कार्यक्रमात ही कविता सादर करताना मराठी कवीचा उल्लेख "नारायण सुर्वे" असाच केला आहे.]

हंबरून वासराले चाटती जवा गाय
तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय

आयाबाया सांगत व्हत्या व्हतो जवा तान्हा
दुस्काळात मायेच्या माजे आटला व्हता पान्हा
पिठामंदी पानी टाकून पाजत जाय
तवा मले पिठामंदी दिसती माझी माय

कन्या-काट्या येचायाला माय जाई रानी
पायात नसे वहान तिच्या फिरे अनवानी
काट्याकुट्यालाही तिचं नसे पाय
तवा मले काट्यामंदी दिसती माझी माय

बाप माझा रोज लावी मायच्या मागं टुमनं
बास झालं शिक्षान आता घेऊ दे हाती काम
शिकुनश्यानं कुठं मोठ्ठा मास्तर हुनार हायं
तवा मले मास्तरमंदी दिसतो माझी माय

दारु पिऊन मायेले मारी जवा माझा बाप
थरथर कापे आन लागे तिले धाप
कसायाच्या दावनीला बांधली जशी गाय
तवा मले गायीमंदी दिसती माझी माय

बोलता बोलता येकदा तिच्या डोळा आलं पानी
सांग म्हने राजा तुझी कवा दिसंल रानी
भरल्या डोल्यान कवा पाहील दुधावरची साय
तवा मले सायीमंदी दिसती माझी माय

म्हनून म्हंतो आनंदानं भरावी तुझी वटी
पुना येकदा जलम घ्यावा तुजे पोटी
तुझ्या चरनी ठेवून माया धरावं तुझं पाय
तवा मले पायामंदी दिसती माझी माय‍

शुक्रवार, २८ मे, २०१०

तुकोबाच्या भेटी शेक्स्पीअर आला - विंदा करंदीकर

तुकोबाच्या भेटी| शेक्स्पीअर आला|
तो झाला सोहळा| दुकानात ||
जाहली दोघांची| उराउरी भेट|
उरातले थेट| उरामध्ये ||
तुका म्हणे "विल्या,| तुझे कर्म थोर |
अवघाची संसार| उभा केला" ||
शेक्स्पीअर म्हणे, | "एक ते राहिले
तुवा जे पाहिले | विटेवरी"||
तुका म्हणे, "बाबा| ते त्वा बरे केले|
त्याने तडे गेले| संसाराला ||
विठ्ठल अट्टल |त्याची रीत न्यारी |
माझी पाटी कोरी | लिहोनिया"||
शेक्स्पीअर म्हणे,| "तुझ्या शब्दांमुळे
मातीत खेळले| शब्दातीत"||
तुका म्हणे, "गड्या| वृथा शब्दपीट |
प्रत्येकाची वाट |वेगळाली ||
वेगळीये वाटे| वेगळाले काटे |
काट्यासंगे भेटे| पुन्हा तोच||
ऐक ऐक वाजे| घंटा ही मंदिरी|
कजागीण घरी| वाट पाहे"||
दोघे निघोनिया| गेले दोन दिशा|
कवतिक आकाशा| आवरेना||

शुक्रवार, २१ मे, २०१०

तरुणपणी - विंदा करंदीकर

तरुणपणी त्याने एकदा दर्यामध्ये
लघवी केली.

आणि आपले उर्वरित आयुष्य
त्यामुळे
दर्याची उंची किती वाढली
हे मोजण्यात खर्ची घातले.

(विरूपिका)

शुक्रवार, २६ मार्च, २०१०

मानवाचे अंती । एक गोत्र - विंदा करंदीकर

मिसिसिपीमध्ये। मिसळू दे गंगा;
र्‍हाइनमध्ये "नंगा"। करो स्नान.

सिंधुसाठी झुरो। ऍमेझॉन थोर,
कांगो बंडखोर। टेम्ससाठी.

नाईलच्या काठी। "रॉकी" करो संध्या;
संस्कृती अन्‌ वंध्या। नष्ट होवो.

व्होल्गाचे ते पाणी। वाहू दे गंगेत;
लाभो निग्रो रेत! पांढरीला.

माझा हिमाचल। धरो अंतर्पट,
लग्नासाठी भट। वेदद्रष्टा!

रक्तारक्तातील। कोसळोत भिंती;
मानवाचे अंती। एक गोत्र.

छप्पन भाषांचा। केलासे गौरव
तोचि ज्ञानदेव। जन्मा येवो.

जागृतांनो फेका। प्राणांच्या अक्षता
ऐसा योग आता। पुन्हा नाही!

सब घोडे बारा टक्के - विंदा करंदीकर

जितकी डोकी तितकी मते 
जितकी शिते तितकी भूते;
कोणी मवाळ कोणी जहाल 

कोणी लठ्ठ कोणी मठ्ठ
कोणी ढीले कोणी घट्ट; 

कोणी कच्चे कोणी पक्के
सब घोडे बारा टक्के!


गोड गोड जुन्या थापा 
(तुम्ही पेरा तुम्ही कापा)
जुन्या आशा नवा चंग 

जुनी स्वप्ने नवा भंग;
तुम्ही तरी काय करणार? 

आम्ही तरी काय करणार?
त्याच त्याच खड्ड्या मधे 

पुन्हा पुन्हा तोच पाय;
जुना माल नवे शिक्के 

सब घोडे बारा टक्के!


जिकडे सत्ता तिकडे पोळी 
जिकडे सत्य तिकडे गोळी;
(जिकडे टक्के तिकडे टोळी) 

ज्याचा पैसा त्याची सत्ता
पुन्हा पुन्हा हाच कित्ता; 

पुन्हा पुन्हा जुनाच वार
मंद घोडा जुना स्वार; 

याच्या लत्ता त्याचे बुक्के
सब घोडे बारा टक्के!


सब घोडे! चंदी कमी; 
कोण देईल त्यांची हमी?
डोक्यावरती छप्पर तरी; 

कोण देईल माझा हरी?
कोणी तरी देईन म्हणा 

मीच फसविन माझ्या मना!
भुकेपेक्षा भ्रम बरा; 

कोण खोटा कोण खरा?
कोणी तिर्ऱ्या कोणी छक्के; 

सब घोडे बारा टक्के!

गुरुवार, २५ मार्च, २०१०

तसेच घुमते शुभ्र कबूतर - विंदा करंदीकर


मनात माझ्या उंच मनोरे
उंच तयावर कबूतरखाना;
शुभ्र कबूतर घुमते तेथे
स्वप्नांचा खाउनिया दाणा.

शुभ्र कबूतर युगायुगांचे-
कधी जन्मले? आणि कशास्तव?
किती दिवस हे घुमावयाचे?
अर्थावाचुन व्यर्थ न का रव?

प्रश्‍न विचारी असे कुणी तरि;
कुणी देतसे अगम्य उत्तर?
गिरकी घेऊन आपणाभवती
तसेच घुमते शुभ्र कबूतर.

बुधवार, २४ मार्च, २०१०

झपताल - विंदा करंदीकर

ओचे बांधून पहाट उठते...
तेव्हापासून झपझपा वावरत असतेस.
कुरकुरणाऱ्या पाळण्यांमधून
दोन डोळे उमलू लागतात
आणि मग इवल्या इवल्या मोदकमुठींतून
तुझ्या स्तनांवर  बाळसे चढते.
उभे नेसून वावरत असतेस.
तुझ्या पोतेऱ्याने म्हातारी चूल
पुन्हा एकदा लाल होते.
आणि नंतर उगवता सूर्य दोरीवरील तीन मुतेले वाळवू लागतो, म्हणून तो तुला हवा असतो!
मधून मधून तुझ्या पायांमध्ये माझी स्वप्ने मांजरासारखी लुडबुडत असतात,
त्यांची मान चिमटीत धरुन
तू त्यांना बाजुला करतेस.
तरीपण चिऊ काऊच्या मंमंमधील
एक उरलेला घास त्यांनाही मिळतो.
तू घरभर भिरभिरत असतेस, लहान मोठ्या वस्तुंमध्‍ये
तुझी प्रतिबिंबे रेंगाळत असतात..
स्वागतासाठी "सुहासिनी"असतेस,
वाढतांना "यक्षिणी"असतेस,
भरवतांना "पक्षिणी" असतेस,
साठवतांना "संहिता" असतेस,
भविष्‍याकरता "स्वप्नसती" असतेस.
....संसाराच्या दहा फुटी खोलीत दिवसाच्या चोवीस मात्रा
चपखल बसवणारी तुझी किमया मला अजूनही समजलेली नाही.

तीर्थाटण - विंदा करंदीकर

तीर्थाटण मी करीत पोचलो
नकळत शेवट तव दारी;
अन तुझिया देहात गवसली
सखये मजला तीर्थे सारी

अधरावरती तव वृंदावन
प्रयाग सापडले नेत्री;
भालावरती ते मानसरोवर,
मानेवरती गंगोत्री

गया तुझ्या गालात मिळाली
रामेश्वर खांद्यावरती
मिळे द्वारका कमरेपाशी
अन काशी अवतीभवती

मोक्षाचीही नुरली इच्छा
नको कृपा याहून दुसरी
तीर्थाटण मी करीत पोचलो
नकळत शेवट तव दारी.

बुधवार, १७ मार्च, २०१०

विंदांना श्रद्धांजली - आणखी काही कणिका

२. प्रेम
सत्य युगाच्या अखेर झाली
प्रेम-द्वेष यांच्यात लढाई
द्वेषच होई विजयी आणि,
प्रेम लपे आईच्या हृदयी!

३. चंद्र आणि क्षय
चंद्र जाहला क्षयी कशाने?
शापबलाने, म्हणती कोणी;
कुजबुजला पण तो माझ्याशी;
या कवितांनी! या कवितांनी!

४. दर्पण
परमेशाला गमलें, आपण
रुप पहावें अपुले सुंदर;
आणिक केला त्यानें दर्पण;
तोच समजतो आपण सागर!

५. पदवी
जिवंत असता, महाकवे, तुज
मिळतील निव्वळ शिव्या घरोघर;
तूं मेल्यावर, त्या मोजुनियां
मिळविल कोणी पदवी त्यावर

६. नारदाचा वारस
नारद मेला; मी रडलो मग;
कोण कळी त्या लाविल नाहक!
शोक कशाला? वदला ईश्वर,
धाडुनि दिधला मी संपादक!

७. इतिहास
इतिहासाचे अवघड ओझे
डोक्यावर घेउनी ना नाचा
करा पदस्थल त्याचे आणिक
चढुनि त्यावर भविष्य वाचा

८. नायक
रामायण वाचुनिया नंतर
बोध कोणता घ्यावा आपण
श्रीरामासम मिळता नायक
वानर सुद्धा मारिती रावण

९. खळी
स्वर्गामधुनी येता बालक
अमृत त्याचे काढुन घेती
उरे रिकामी वाटी जवळी
ती खळी ही गालावरती

[संदर्भ: हितगुज]

मंगळवार, १६ मार्च, २०१०

विंदांना श्रद्धांजली - कणिका उत्क्रांती

[ज्ञानपीठ पारितोषिक विजेते मराठी कवी कै. विंदा करंदीकर  यांची एक कणिका  सादर करत आहे. कणिका  म्हणजे चार ओळींची छोटीशी कविता...]

उत्क्रांती
माकड हसले त्याच क्षणाला,
माकड मेले; माणूस झाला,
परदु:खाने रडला प्राणी
देव प्रकटला त्याच ठिकाणी 


[संदर्भ: दै. लोकमत]

शुक्रवार, २६ फेब्रुवारी, २०१०

एवढे लक्षात ठेवा - विंदा करंदीकर

उंची न आपुली वाढते, फारशी वाटून हेवा ।
श्रेय ज्याचे त्यास द्यावे; एवढे लक्षात ठेवा ॥

ती पूर्वजांची थोरवी, त्या पूर्वजांना गौरवी ।
ती न कामी आपुल्या, एवढे लक्षात ठेवा ।।

जाणते जे सांगती, ते ऐकून घ्यावे सदा ।
मात्र तीही माणसे; एवढे लक्षात ठेवा ॥

चिंता जगी या सर्वथा, कोणा न येई टाळता ।
उद्योग चिंता घालवी; एवढे लक्षात ठेवा ॥

विश्वास ठेवावाच लागे, व्यवहार चाले त्यावरी ।
सीमा तयाला पाहिजे; एवढे लक्षात ठेवा ॥

दुप्पटीने देतसे जो, ज्ञान आपण घेतलेले ।
तो गुरूचे पांग फेडी; एवढे लक्षात ठेवा ॥

माणसाला शोभणारे, युद्ध एकच या जगी ।
त्याने स्वतःला जिंकणे; एवढे लक्षात ठेवा ॥

[’निर्वाणीचे गझल’ पैकी एक गझल. संदर्भ लोकसत्ता]

सोमवार, ११ जानेवारी, २०१०

कविता - शांता शेळके

शेवटची ओळ लिहीली
आणि तो दूर झाला
आपल्या कवितेपासून
बराचसा थकलेला
पण सुटकेचे समाधानही अनुभवणारा
प्रसूतीनंतरच्या ओल्या बाळंतीणीसारखा
जरा प्रसन्न, जरा शांत
नाही खंत, नाही भ्रांत....

आणि ती कविता नवजात
एकाकी, असहाय, पोरकी
आधाराचे बोट सुटलेल्या
अजाण पोरासारखी
भांबावलेली, भयभीत,
अनुभवणारी एका उत्कट नात्याची
परिणती विपरीत

ती आहे आता पडलेली
कागदाच्या उजाड माळावर
आपल्या अस्तिवाचा अर्थ शोधत
तो मैलोगणती दूर, वेगळ्या विश्वात
संपूर्ण, संतुष्ट, आत्मरत!

रविवार, १० जानेवारी, २०१०

प्रेम करावे असे, परंतू.... - विंदा करंदीकर

हिरवे हिरवे माळ मोकळे;
ढवळ्या ढवळ्या त्यावर गाई;
प्रेम करावे अशा ठिकाणी
विसरुनि भीती विसरुनि घाई.

प्रेम करावे, रक्तामधले;
प्रेम करावे शुद्ध, पशूसम;
शतजन्मांच्या अवसानाने
रक्तामधली गाठावी सम.

प्रेम करावे मुके अनामिक;
प्रेम करावे होउनिया तृण;
प्रेम करावे असे, परंतू....
प्रेम करावे हे कळल्याविण.

ऊन हिवाळ्यांतिल शिरशिरता - विंदा करंदीकर

ऊन हिवाळ्यांतिल शिरशिरता
स्थितप्रज्ञ काळ्या दगडावर,
- मला वाटते क्षणभर फुटतो
दगडाला इच्छेचा अंकुर.

ऊन हिवाळ्यांतिल हळदीचे
किरिट घालते वृद्धा वडावर !
- मला वाटते तळ्यांत पाहुन
हात फिरवितो तो दाढीवर!

ऊन हिवाळ्यांतिल कुडकुडते,
कुशीत शिरते दिसतां डोंगर;
-मला वाटते त्यालाही मग
गरम झऱ्याचा फुटतो पाझर.

ऊन हिवाळ्यांतिल भुळभुळते
आजीच्या उघड्या पाठीवर;
- तिच्या भ्रमाला गमते आपण
पुन्हा जरीचा ल्यालो परकर.

ऊन हिवाळ्यांतिल हिरमुसते;
रुसते; अन माळावर बसते;
- मला वाटते त्यालाही पण
असेच भलते वाटत असते.