सोमवार, १२ जुलै, २०१०

माणुसपण - कुसुमाग्रज


प्रसन्न झाला देव मानवा
म्हणे, ’माग तुज काय हवे ते’,
’शस्त्र हवे मज’, माणूस वदला
’साध्य सर्व हो पराक्रमाते’


शस्त्र मिळाले, हो समरांगण
अवघ्या भूचे हृदय विदारी
माखुनिया रक्तात राहिला
पुन्हा उभा देवाच्या द्वारी!


’काय हवे तुज ?’ शस्त्र न पुरते-
करील शास्त्रच मंगल जीवन
ज्ञानसाधनी ये ईश्वरता
स्वर्गधरेचे करीन मीलन


शास्त्र मिळाले, शस्त्र मिळाले
स्वर्ग परी स्वप्नातच राही.
मानव हतबल आणिक हताश
पुन्हा प्रभुच्या सन्निध येई.


’काय हवे तुज ?’, ’वावरलो मी-
वाट दिसेना या तिमिरांतून
देव म्हणे, तुज जवळीच आहे
दीप लाव तो, तव माणुसपण!


लोकसत्ता. मंगळवार, २ ऑगस्ट २००५

बुधवार, ७ जुलै, २०१०

माय - स.ग. पाचपोळ

[फॉरवर्डस मधून आलेल्या एका ईमेलमध्ये खालील कविता मिळाली. मूळ फॉरवर्डमध्ये नारायण सुर्वे कवी असल्याचा उल्लेख केला गेला होता. पण प्रणव प्रियांका प्रकाशा ह्या तरुण, जाणकार कवींनी सुचवलेल्या दुरुस्तीनुसार स.ग.पाचपोळ हे मूळ कवी आहेत. त्याप्रमाणे बदल करत आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की जितेंद्र जोशी ह्यांनी देखिल एका कार्यक्रमात ही कविता सादर करताना मराठी कवीचा उल्लेख "नारायण सुर्वे" असाच केला आहे.]

हंबरून वासराले चाटती जवा गाय
तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय

आयाबाया सांगत व्हत्या व्हतो जवा तान्हा
दुस्काळात मायेच्या माजे आटला व्हता पान्हा
पिठामंदी पानी टाकून पाजत जाय
तवा मले पिठामंदी दिसती माझी माय

कन्या-काट्या येचायाला माय जाई रानी
पायात नसे वहान तिच्या फिरे अनवानी
काट्याकुट्यालाही तिचं नसे पाय
तवा मले काट्यामंदी दिसती माझी माय

बाप माझा रोज लावी मायच्या मागं टुमनं
बास झालं शिक्षान आता घेऊ दे हाती काम
शिकुनश्यानं कुठं मोठ्ठा मास्तर हुनार हायं
तवा मले मास्तरमंदी दिसतो माझी माय

दारु पिऊन मायेले मारी जवा माझा बाप
थरथर कापे आन लागे तिले धाप
कसायाच्या दावनीला बांधली जशी गाय
तवा मले गायीमंदी दिसती माझी माय

बोलता बोलता येकदा तिच्या डोळा आलं पानी
सांग म्हने राजा तुझी कवा दिसंल रानी
भरल्या डोल्यान कवा पाहील दुधावरची साय
तवा मले सायीमंदी दिसती माझी माय

म्हनून म्हंतो आनंदानं भरावी तुझी वटी
पुना येकदा जलम घ्यावा तुजे पोटी
तुझ्या चरनी ठेवून माया धरावं तुझं पाय
तवा मले पायामंदी दिसती माझी माय‍