लवलव हिरवीगार पालवी काट्यांची वर मोहक जाळी
घमघम करिती लोलक पिवळे फांदी तर काळोखी काळी
झिरमिर झरती शेंगा नाजूक वेलांटीची वळणे वळणे
त्या सार्यातूनी झिरमिर झरती रंग नभाचे लोभसवाणे
कुसरकलाकृती अशी बाभळी तिला न ठावी नागर रिती
दूर कुठेतरी बांधावरती झुकून जराशी उभी एकटी
अंगावरती खेळवी राघू लागट शेळ्या पायाजवळी
बाळ गुराखी होऊनीया मन रमते तेथे सांज सकाळी
येथे येऊन नवेच होऊन लेऊन हिरवे नाजूक लेणे
अंगावरती माखूनी अवघ्या धुंद सुवासिक पिवळे उटणे..