गुरुवार, १५ फेब्रुवारी, २००७

जाईन दूर गावा - आरती प्रभु

तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा
घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा

पाण्यांत ओंजळीच्या आला चुकून मीन
चमकून हो तसाच गाण्यांत अर्थ यावा

शिंपीत पावसाळी सर्वत्र या लकेरी
यावा अनाम पक्षी, स्पर्शू मलाच यावा.

देतां कुणी दुरून नक्षत्रसे इषारे
साराच आसमंत घननीळ होत जावा.

पेरून जात वाळा अंगावरी कुणी जो,
शेल्यापरी कुसुंबी वाऱ्यावरी वहावा.

तारांवरी पडावा केव्हा चुकून हात:
विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा.

तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा,
घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा

1 टिप्पणी:

तेजस्विनी पाटील म्हणाले...

अत्यंत सुंदर गीत जे आरती प्रभू यांच्या कालाय तस्मै नमः या नाटकामध्ये अतिशय चपखलपणे वापरले आहे. हे गीत गूढगुंजनपर असून अनेक रहस्यमय अर्थछटा त्यात लपलेल्या आहेत.