मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नसे
नसो आज ऐश्वर्य या माउलीला, यशाची पुढें दिव्य आशा असे
जरी पंचखंडांतही मान्यता घे स्वसत्ताबळें श्रीमती इंग्रजी
मराठी भिकारीण झाली तरीही कुशीचा तिच्या, तीस केवीं त्यजी ॥१॥
जरी मान्यता आज हिंदीस देई उदेलें नवें राष्ट्र हें हिंदवी,
मनाचे मराठे मराठीस ध्याती हिची जाणुनी योग्यता, थोरवी,
असूं दूर पेशावरीं, उत्तरीं वा असूं दक्षिणीं दूर तंजावरीं,
मराठी असे आमुची मायबोली, अहो ज्ञानदेवीच देखा खरी ॥२॥
मराठी असे आमुची मायबोली जरी भिन्नधर्मानुयायी असूं
पुरी बांणली बंधुता अंतरंगीं, हिच्या एक ताटांत आम्ही बसूं
हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडूं वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरीं
जगन्मान्यता हीस अर्पूं प्रतापें हिला बैसवूं वैभवाच्या शिरीं ॥३॥
हिच्या लक्तरांची असे लाज आम्हां, नका फक्त पाहू हिच्या लक्तरां
प्रभावी हिचे रूम चापल्य देखा पडवी फिकी ज्यापुढे अप्सरा
न घालूं जरी वाङमयातील उंची हिरे मोतियांचे हिला दागिने
‘मराठी असे आमुची मायबोली’, वृथा ही बढाई सुकार्याविणें ॥४॥
मराठी असे आमुची मायबोली अहो पारतंत्र्यांत ही खंगली
हिची थोर संपत्ति गेली उपेक्षेमुळें खोल कालार्णवाच्या तळीं
तरी सिंधु मंथूनि काढूनि रत्नें नियोजूं तयांना हिच्या मंडणीं
नको रीण, देवोत देतील तेव्हा जगांतील भाषा हिला खंडणी ॥५॥
बुधवार, २८ जानेवारी, २००९
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
२ टिप्पण्या:
मी आपला अत्यंत ऋणी आहे आपण ही सर्वश्रेष्ठ कविता इथे उपलब्ध केलीत, मी आज सकाळी ज्योत्स्ना भोळे यांनी गायलेले हे गीत ऐकले, यावर मी ब्लॉग लिहीत आहे, इथे लिंक उपलब्ध करेन , धन्यवाद !
मी दिलीप राके परभणी, दिनविशेष लिहिताना ही कविता नक्की कोणाशी हा प्रश्न पडला होता तो तो ह्या पोस्टमुळे सुटला माधव जुलियन यांची आज पुण्यतिथी आहे 28 नोव्हेंबर.
टिप्पणी पोस्ट करा