रविवार, ६ डिसेंबर, २००९

रात्रही का वैऱ्याचीच, घालशील गा जन्माला! - बा.सी.मर्ढेकर

ओठांवर आली पूजा, भरे मनांत कापरें
ओल्या पापांची वाळून, झालीं वातड खापरें
पापांतून पापाकडे , जाई पाप्याचा विचार
आणि पुण्याचीं किरणें, लोळतात भुईवर
माथीं घेतलें गा ऊन, कटींखांदीं काळेंबेरें
तुझ्या आवडीचा क्षण, डोळ्यांतून मागे फिरे
गढूळला तोही क्षण, मतलबाच्या मातीने
कैसें पोसावे त्यांवर, आर्द्र स्वप्नांना स्वातीने
घडय़ाळांत आता फक्त, एक मिनिट बाराला
रात्रही का वैऱ्याचीच, घालशील गा जन्माला!

1 टिप्पणी:

NARROWGATE म्हणाले...

रात्री स्वतःची खऱ्या स्वतःशी गाठ पडणे अटळ म्हणून वैर्‍याची रात्र !ओल्या पापांचा आणि आर्द्र स्वप्नांचा अन्वय कदाचित निषिद्ध, अनावर आदिम गोष्टीशी लागेल.मतलबाची माती हे सकाम भक्तीचे वर्णन छान वाटते.पापाची वातड खापरे -सवयीने पश्चातापही वाटेनासा झालेल्या पापकृत्यांचे वर्णन.