सोमवार, १६ एप्रिल, २००७

शांतता - शंकर वैद्य

घराचे पाठीमागले दार उघडले...
तेवढाच काय तो कडीचा आवाज
- बाकी शांतता...
- हिरवी शांतता...
- गार शांतता...
हिरव्यागार बागेत आलेले रेशमी सूर्यकिरण
फुले फुललेली...उमलती शांतता...मंद गंध
नव्हे ... प...रि...म...ल
अलगद उडणारी फुलपाखरें
फांदीवर सरडा..सजग...स्तब्ध
पलीकडे ऊंच आभाळात देवीच्या देवळाचा कळस
त्या भोवती घारीचे भ्रमण
शांततेवर उमटलेला एक वलयाकार तरंग
सरसरत गेलेला पानांचा आवाज...साप
...नंतर कोसळती शांतता
पण मुंग्यांची संथ निमूट चाललेली रांग
...शांतता सजीव...गतिमान
अलगद अलगद तरंगत कुठून तरी आलेले
एक अलवार बाळपीस
वाऱ्याची मंद, नीरव झुळूक
दयाळ पक्षाची एक प्रश्नार्थक शीळ
...शांतता मधुरलेली
मऊ मातीवर उमटलेली माझी पावले...त्यांचे ठसे
जादूचे...गूढ
पुढे पुढे नेणाऱ्या पाऊलवाटेचे लाडीक वळण
पुढे गहन..गगन
शांततेत ऊभे माझे निवांत एकटेपण!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: