रविवार, १५ एप्रिल, २००७

जगत मी आलो असा - सुरेश भट

जगत मी आलो असा (रंग माझा वेगळा)

जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही!
एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही!

जन्मभर अश्रूंस माझ्या शिकविले नाना बहाणे;
सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही!

कैकदा कैफात मझ्या मी विजांचे घोट प्यालो;
पण प्रकाशाला तरीही हाय, मी पटलोच नाही!

सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळले मी;
एकदा हसलो जरासा, मग पुन्हा हसलोच नाही!

स्मरतही नाहीत मजला चेहरे माझ्या व्यथांचे;
एवढे स्मरते मला की, मी मला स्मरलोच नाही!

वाटले मज गुणगुणावे, ओठ पण झाले तिऱ्हाइत;
सुचत गेली रोज गीते; मी मला सुचलोच नाही!

संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा....
लोक मज दिसले अचानक; मी कुठे दिसलोच नाही!

३ टिप्पण्या:

चित्तरंजन भट म्हणाले...

प्रिय पद्माकर आणि किरण,

सप्रेम नमस्कार.
'कविता' हा ब्लॉग आवडला. मांडणी चांगली आहे. एका ठिकाणी चांगल्या कविता वाचायला मिळाल्या.

कविवर्य सुरेश भट आणि मराठी गझलेला समर्पित www.sureshbhat.in हे संकेतस्थळ नुकतेच १५ एप्रिलला उघडले आहे. आपण यावे, इतरांनाही यायला सांगावे आणि सक्रिय सहभाग घ्यावा. आपल्या अपेक्षा आणि अभिप्राय जरूर द्यावा. काही दिवसात कविवर्य सुरेश भटांच्या निवडक कविता देण्याचा मानस आहे.
आपणांस आवडलेल्या भटांच्या कविता तिथे जरूर द्याव्यात. रसग्रहण सोबत दिल्यास उत्तम!

कळावे.
आपला,

चित्तरंजन भट

Unknown म्हणाले...

या कवितेचे रसग्रहण

Unknown म्हणाले...

चित्त मंदिर