सोमवार, १७ जानेवारी, २०११

नको नको रे पावसा - इंदिरा संत

नको नको रे पावसा
असा धिंगाणा अवेळी :
घर माझे चंद्रमौळी
आणि दारात सायली;

नको नाचू तडातडा
असा कौलारावरून :
तांबे-सतेली-पातेली
आणू भांडी मी कोठून?

नको करू झोंबाझोंबी :
माझी नाजूक वेलण,
नको टाकू फुलमाळ
अशी मातीत लोटून;

आडदांडा नको येऊ
झेपावत दारातून :
माझे नेसूचे जुनेर
नको टाकू भिजवून;

किती सोसले मी तुझे
माझे एवढे ऐक ना :
वाटेवरई माझा सखा
त्याला माघारी आण ना;

वेशीपुढे आठ कोस
जा रे आडवा धावत;
विजेबाई, कडाडून
मागे फिरव पांथस्थ;

आणि पावसा, राजसा
नीट आण सांभाळून :
घाल कितीही धिंगाणा
मग मुळी न बोलेन;

पितळेची लोटीवाटी
तुझ्यासाठी मी मांडीन,
माझ्या सख्याच्या डोळ्यांत
तुझ्या विजेला पूजीन;

नको घालू रे पावसा
असा धिंगाणा अवेळी :
घर माझे चंद्रमौळी
आणि दारात सायली.

मध्यरात्रिच्या निवांत वेळी - इंदिरा संत

मध्यरात्रिच्या निवांत वेळी
सौंधावरती उभे रहावे :
झुळझुळता अंधार भोवती,
पुन्हा नवेपण मनास यावे;

निर्जन रस्ता, धावे मोटर :
लखलख डोळे वळणावरती;
प्रकाशपाउस डोंळ्यांमधला
क्षणभर घ्यावा अंगावरती;

निर्जन रस्ता, कडेकडेने
कुणी पोरका जातो चालत :
क्षणभर जावे लपतछपत पण
त्याच्या मागुन - त्याला सोबत;

दूर धुक्यामधि झाडी काळी,
उंच मधोमध गढूळ इमला :
क्षणभर जावे सावल्यांतुनी
जागवावया त्या बाधेला;

घरामनोऱ्यांवर ओळीने
रंग विजेचे झगमग करती :
गुलबाक्षीचे लक्ष ताटवे
फुले खुडावी हलक्या हाती;

मध्यरात्रिच्या निवांत वेळी
सौंधावरती उभे रहावे :
झुळझुळता अंधार भोवती,
क्षण दचकावे... क्षण हरखावे.

गुरुवार, १३ जानेवारी, २०११

सुख - ग. दि. माडगूळकर

एका वटवृक्षाखाली,बसुनिया दोन श्वान
एकमेकांना सांगती,अनुभव आणि ज्ञान
एक वये वाढलेले,एक पिलू चिमुकले
वृध्द-बालकात होते,काही भाषण चालले.

कोणाठायी सापडले तुला जीवनात सुख?
वृध्द बालका विचारी,त्याचे चाटुनिया मुख.

मला वाटते आजोबा,सुख माझ्या शेपटात
सदाचाच झटतो मी,त्यास धराया मुखात
माझ्या जवळी असून,नाही मज गवसत
उगाचच राहतो मी,माझ्या भोवंती फिरत

अजाण त्या बालकाची,सौख्य कल्पना ऐकून,
क्षणभरी वृध्द श्वान,बसे लोचन मिटून.

कोणाठायी आढळले तुम्हा जीवनात सुख?
तुम्ही वयाने वडील,श्वान संघाचे नायक!

बाल श्वानाच्या प्रश्नाला देई जाणता उत्तर -
तुझे बोलणे बालका,बिनचूक बरोबर -
परि शहाण्या श्वानाने,लागू नये सुखापाठी
आत्मप्रदक्षिणा येते,त्याचे कपाळी शेवटी.

घास तुकडा शोधावा,वास घेत जागोजाग
पुढे पुढे चालताना पुच्छ येते मागोमाग.