बहीणाबाई चौधरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बहीणाबाई चौधरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०२३

स्फुट ओव्या

 माय म्हनता म्हनता 

    होट होटालागे भिडे 

आत्या म्हनता म्हनता 

    केवढं अंतर पडे


माय म्हतली म्हतली 

    जशी तोंडातली साय 

बाय म्हतली बिराणी

    जशी भरडली दाय 


ताता म्हनता म्हनता 

    दातामधीं जीभ अडे 

काका म्हनता म्हनता 

    कशी मांघे मांघे दडे 


जीजी म्हनता म्हनता     

    झाला जीभले निवारा 

सासू म्हनता म्हनता 

     गेला तोंडातून वारा! 

शनिवार, ७ फेब्रुवारी, २००९

मानूस - बहीणाबाई चौधरी

मानूस मानूस

मतलबी रे मानसा,
तुले फार हाव
तुझी हाकाकेल आशा
मानसा मानसा,
तुझी नियत बेकार
तुझ्याहून बरं गोठ्यांतलं जनावर
भरला डाडोर
भूलीसनी जातो सूद
खाईसनी चारा

गायम्हैस देते दूध
मतलबासाठीं
मान मानूस डोलये
इमानाच्यासाठीं
कुत्रा शेंपूट हालये
मानसा मानसा,
कधीं व्हशीन मानूस
लोभासाठी झाला मानसाचा रे कानूस !

बुधवार, ११ जुलै, २००७

पेर्ते व्हा - बहीणाबाई चौधरी

पेरनी पेरनी
आले पावसाचे वारे
बोलला पोपया
पेर्ते व्हा रे, पेर्ते व्हा रे!

पेरनी पेरनी
आभायात गडगड,
बरस बरस
माझ्या उरी धडधड!

पेरनी पेरनी
आता मिरुग बी सरे.
बोलेना पोपया
पेर्ते व्हा रे, पेर्ते व्हा रे!

पेरनी पेरनी
अवघ्या जगाच्या कारनी.
ढोराच्या चारनी,
कोटी पोटाची भरनी

सोमवार, १८ डिसेंबर, २००६

मन -बहीणाबाई चौधरी

मन -----
मन वढाय वढाय
उभ्या पिकातल ढोर
किती हाकलं हाकलं
फिरी येते पिकावर

मन पाखरू पाखरू
त्याची काय सांगू मात
आता व्हत भुइवर
गेल गेल आभायात

मन लहरी लहरी
त्याले हाती धरे कोन
उंडारल उंडारल
जस वारा वाहादन

मन जह्यरी जह्यरी
याच न्यार रे तन्तर
आरे इचू साप बरा
त्याले उतारे मन्तर

मन एव्हड एव्हड
जस खसखसच दान
मन केवढ केवढ
आभायतबि मावेन

देवा आस कस मन
आस कस रे घडल
कुठे जागेपनी तुले
अस सपन पडल